Home क्राईम गोदावरी आयएमआर कॉलेजात धडसी चोरी; चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद !

गोदावरी आयएमआर कॉलेजात धडसी चोरी; चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद !

0
344

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील गोदावरी आय. एम. आर. कॉलेजमध्ये अज्ञात चोरट्यांनी घुसून प्रशासकीय अधिकारी मयुर हेमराज पाटील यांच्या कक्षासह अकाउंट विभागातून ₹१ लाख ५०० रुपये रोख रक्कम आणि सीसीटीव्ही स्टोरेजचे एन.व्ही.आर. (NVR) असा एकूण १ लाख ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा प्रकार कॉलेजच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. शनिवार, १९ जुलै रोजी सकाळी ८ वाजता ही बाब उघडकीस आल्यानंतर प्रशासकीय अधिकारी मयुर पाटील यांनी तात्काळ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

मयुर पाटील (वय ३५, रा. ज्ञानदेव नगर, जळगाव) हे गोदावरी आय. एम. आर. कॉलेजमध्ये २०११ पासून प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या अधिपत्याखाली कॉलेजचे अकाउंट विभाग, प्राचार्य कक्ष, एम.ओ.डी. कॅबिन, शाखा प्रमुखांचे कक्ष यासह इतर अनेक महत्त्वाचे विभाग येतात. १८ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता कार्यालयीन कामकाज आटोपल्यानंतर सर्व विभाग व्यवस्थित बंद करून कॉलेजचे मुख्य गेट सुरक्षा रक्षक हरीचंद्र पाटील यांच्याकरवी कुलूप लावून बंद करण्यात आले होते. त्यानंतर सायंकाळी ६ वाजता हरीचंद्र पाटील यांनी रात्रपाळीचे सुरक्षा रक्षक दीपक अनिल पाटील यांच्याकडे कामकाज सोपवून ते देखील निघून गेले होते.

शनिवारी १९ जुलै रोजी सकाळी ८ वाजता मयुर पाटील घरी असताना, कॉलेजमध्ये चोरी झाल्याचे समजले. मयुर पाटील यांनी तात्काळ कॉलेजला जाऊन पाहणी केली असता, अकाउंट विभागातील लेखापालाच्या काउंटरवरील कपाटात ठेवलेली विद्यार्थ्यांच्या अॅडमिशन फीची रोख रक्कम १ लाख रूपये गायब असल्याचे निदर्शनास आले. तसेच, कार्यालयातील फाईल्स व इतर दस्तऐवज फेकलेले, कपाटे व काउंटर वाकवून नुकसान केलेले आणि सीसीटीव्ही स्टोरेजचे हाईव्हिजन कंपनीचे एन.व्ही.आर. गायब झाल्याचे दिसून आले. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.


Protected Content

Play sound