जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । नशिराबाद येथील पुठ्ठा फॅक्टरीतून निघालेला ट्रकच्या कॅबीनला बॅटरीच्या शॉर्टसर्कीटमुळे अचानक आग लागल्याची घटना नशिराबाद टोल नाक्याजवळ सोमवारी सायंकाळी घडली.
आग लागल्याचे कळताच जवळ असलेल्या टोल नाक्यावरील कर्मचारी आणि नशिराबाद पोलीसांनी धाव घेवून आग विझविण्यात आली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, राष्ट्रीय महामार्गावरील नशिराबाद टोल नाका आणि जयभोले हॉटेलदरम्यान असलेल्या गायत्री पेपर मिल नावाची पुठ्ठा फॅक्टरी आहे. धुळे येथून पुठ्ठा घेवून आलेला ट्रक (एमएच १८ एम ९६२) हा सोमवारी १४ फेब्रुवारी रोजी सांयकाळी ७ वाजता गायत्री मिल फॅक्टरीत खाली करण्यात आला. त्यानंतर फॅक्टरीत पुठ्ठा खाली केल्यानंतर ट्रक पुन्हा धुळ्याकडे जाण्यासाठी राष्ट्रीय महामार्गावर लागला. त्याचवेळी ट्रकच्या बॅटरीत शॉर्टसर्कीट झाल्याने चालत्या ट्रकच्या कॅबिनमध्ये आग लागली. त्यावेळी ट्रक कॅबिनमध्ये आग लागल्याचे ट्रक चालक सादीक वाहेद शेख रा. एरंडोल यांच्या लक्षात आल्याने त्यांनी जागेवरच ट्रक थांबवून कॅबिनच्या बाहेर उडी घेतली. त्यामुळे दोघे सुदैवाने बचावले आहे. त्यानंतर नशिराबाद टोल नाक्यावर कार्यरत असलेले कर्मचारी आणि नशिराबाद पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी पोहेकॉ अतुल महाजन, पो.कॉ. विजय अहिरे, पोलीस वाहन चालक अस्मत अली बशीद अली सैय्यद यांनी तातडीने धाव घेवून आग विझविण्यासाठी मदत केली. यावेळी लागलेल्या आगीत कॅबीनमधील सामान जळून खाक झाले आहे.