जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । लग्न सोहळा आटोपून गावाकडे परतत असताना चुकीच्या रेल्वेत बसल्याचे लक्षात आले आणि चालत्या रेल्वेतून उतरताना मुकेश मुरलीधर मस्के (रा. तुमसर रोड, जि. भंडारा) हा तरुण रेल्वेखाली ओढला गेला. यात त्याचे दोन्ही पाय कापले गेल्याची घटना सोमवारी ४ मार्च रोजी मध्यरात्री दीड वाजता जळगाव रेल्वेस्थानकाच्या पलाट क्रमांक ३ वर घडली. लोहमार्ग पोलिसांनी तरूणाला गंभीर जखमी अवस्थेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मुकेश मस्के हा तरुण मित्रासह जळगाव येथे लग्नासाठी आला होता. लग्न आटोपल्यावर परत तुमसर रोड येथे जाण्यासाठी सोमवारी ४ मार्च रोजी मध्यरात्री दीड वाजता जळगाव रेल्वेस्थानकाच्या पलाट क्रमांक ३ वर आला. त्यावेळी विदर्भ एक्सप्रेस समजून तो नाशिक-अमरावती एक्सप्रेसमध्ये बसला. रेल्वे सुरू होऊन स्थानकावरून निघाली. त्यावेळी त्याच्या लक्षात आले की, ही रेल्वे विदर्भ एक्सप्रेस नसून दुसरीच रेल्वे आहे. त्यामुळे तो चालत्या रेल्वेतून प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर खाली उतरवण्याचा प्रयत्न केला. प्लॅटफार्मवर त्याने उडी तर मारली मात्र एक हात रेल्वे डब्याच्या दांडीला पकडलेल्या अवस्थेत राहिल्याने तो गाडीखाली ओढल्या गेला.
ही रेल्वे प्लॅटफॉर्मवरून पूर्ण पुढे निघूल गेल्यानंतर स्थानकावरील प्रवाशांनी तसेच रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी तरुणाचे दोन्ही पाय कापल्या जाऊन तो प्लॅटफार्म व रेल्वे रुळाच्यामध्ये रक्तबंबाळ अवस्थेत पडलेला दिसला. त्याच्या एका पायाचा तुकडा तर दोन्ही रेल्वे रुळांच्या मध्ये पडलेला होता. गंभीर जखमी झालेल्या तरुणाला लोहमार्ग पोलिस ठाण्याचे पोहेकॉ सचिन भावसार व पोकॉ किशोर पाटील यांनी रिक्षाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. रेल्वे पोलिसांनी रुग्णवाहिकेची प्रतीक्षा न करता तातडीने त्याला रुग्णालयात दाखल केल्याने या तरुणाचे प्राण वाचण्यास मदत झाली.