Home प्रशासन तहसील बोरखेडा खुर्द ग्रामस्थांचे तहसीलदारांना निवेदन

बोरखेडा खुर्द ग्रामस्थांचे तहसीलदारांना निवेदन


यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल तालुक्यातील मौजे बोरखेडा खुर्द हे आदिवासी गाव डोंगरापासून ५ ते ६ किलोमीटर अंतरावर वसलेले आहे. या गावातील लोकांचा उदरनिर्वाह प्रामुख्याने शेती आणि हातमजुरीवर अवलंबून आहे. गावातील सर्वच लोक हातमजुरी करून आपला चरितार्थ चालवतात. मात्र, गेल्या ४ ते ५ दिवसांपासून शेतशिवारात जंगली बिबट्याचा वावर वाढला असून, यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. यासंदर्भात ग्रामस्थांनी आज तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांना निवेदन दिले.

काही शेतकरी आणि मजुरांना शेतात काम करताना बिबट्या दिसून आला आहे. त्यामुळे मजुरी करणाऱ्या कामगारांना जीवितहानीची भीती वाटू लागली असून, शेतीची कामे करणे जिकिरीचे झाले आहे. इतकेच नव्हे, तर मेंढपाळांनाही बिबट्याचे दर्शन झाले असून, त्यांच्या मेंढ्या आणि बकऱ्यांपैकी दोन प्राण्यांची बिबट्याने शिकार केल्याची घटना घडली आहे.

परिणामी, शेतकरी आणि मजूर जीव मुठीत घेऊन कसेबसे आपली शेतीची कामे करत आहेत. या परिस्थितीमुळे गावकऱ्यांमध्ये तणाव निर्माण झाला असून, जीवितहानी टाळण्यासाठी संबंधित विभागाने तातडीने यावर उपाययोजना करावी, अशी नम्र विनंती गावकऱ्यांनी केली आहे. बिबट्याचा बंदोबस्त करून गावकऱ्यांना सुरक्षितता प्रदान करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.


Protected Content

Play sound