Home मनोरंजन धर्मेंद्र यांच्या निधनाने बॉलिवूड शोकमग्न; सनी देओलकडून मुखाग्नी

धर्मेंद्र यांच्या निधनाने बॉलिवूड शोकमग्न; सनी देओलकडून मुखाग्नी

0
116

मुंबई-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते, ‘ही-मॅन’ म्हणून ओळखले जाणारे धर्मेंद्र यांनी वयाच्या 89व्या वर्षी अखेरचा श्वास घेतल्याने हिंदी सिनेसृष्टी शोकसागरात बुडाली आहे. दीर्घकाळापासून प्रकृती अस्वस्थ असलेल्या धर्मेंद्र यांच्यावर त्यांच्या जुहू येथील राहत्या घरी उपचार सुरू होते. मात्र, सोमवार दुपारी त्यांच्या जीवनप्रवाहाचा शेवट झाला. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे देओल कुटुंबीयांकडून निधनाबाबत कुठलेही अधिकृत निवेदन न देता, अवघ्या अर्ध्या तासात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सोमवारी दुपारी साधारण साडेबारा वाजताच्या सुमारास धर्मेंद्र यांच्या राहत्या घरी अचानक रुग्णवाहिका पोहोचली. त्यावेळी घराबाहेर प्रतीक्षेत असलेल्या चाहत्यांच्या मनात भीतीची छाया पसरली. काही वेळातच त्यांच्या प्रकृतीची गंभीर माहिती समोर येऊ लागली. घराबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली, नातेवाईकांची लगबग सुरू झाली आणि मुलीही तातडीने जुहू येथील घरात दाखल झाल्या. याच वेळी विले पार्ले येथील पवनहंस स्मशानभूमीत हेमा मालिनी आणि ईशा देओल दिसल्या, ज्यामुळे परिस्थितीचे गांभीर्य अधिकच स्पष्ट झाले.

कुणालाही काही कळण्याच्या आत धर्मेंद्र यांचा शेवटचा प्रवास सुरू झाला. पवनहंस स्मशानभूमीत अल्पावधीत सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आणि भावनिक वातावरणात त्यांच्या थोरल्या मुलाने, अभिनेता सनी देओलने वडिलांना मुखाग्नी दिला. सहा दशकांहून अधिक काळ सिनेसृष्टीवर अधिराज्य गाजवणारा ‘ही-मॅन’ आता स्मृतींमध्येच उरला. चाहत्यांना, सहकाऱ्यांना आणि संपूर्ण उद्योगाला दिलेला हा अनपेक्षित धक्का सावरणे कठीण ठरत आहे.

धर्मेंद्र यांना 12 नोव्हेंबर रोजी ब्रीच कँडी रुग्णालयातून कुटुंबाच्या विनंतीवरून डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यानंतर त्यांच्यावर घरीच उपचार चालू होते. या दरम्यान त्यांच्या प्रकृतीबाबत अनेक अफवा सोशल मीडियात पसरू लागल्या. यावर देओल कुटुंबाने नाराजी व्यक्त करत माध्यमांवर आणि पॅपाराझींवर टीकाही केली होती. सनी देओलने घराबाहेर उभ्या छायाचित्रकारांना फटकारल्याचा व्हिडिओ त्यावेळी चांगलाच व्हायरल झाला होता. ईशा देओल आणि हेमा मालिनी यांनीही सोशल मीडियावर पोस्ट करून अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले होते. तरीदेखील, निधनानंतरही कुटुंबीयांनी कोणतेही अधिकृत निवेदन अद्याप जारी केलेले नाही.

दरम्यान, अत्यंत काकताळी योगायोग म्हणजे सोमवारीच ‘इक्कीस’ या आगामी चित्रपटातील धर्मेंद्र यांच्या भूमिकेचे नवे मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आले. या पोस्टरमध्ये धर्मेंद्र यांची व्हॉइस नोट ऐकू येते आणि चाहत्यांना त्या आवाजाने भावनिक केले. काही तासांतच तोच आवाज अनंतात विलीन झाला हे जाणून त्यांच्या चाहत्यांच्या डोळ्यात पाणी आले.

धर्मेंद्र यांच्या अचानक निधनाने हिंदी चित्रपटसृष्टीतील एक अजरामर अध्याय बंद झाला आहे. ताकदीच्या भूमिकांपासून रोमँटिक नायकापर्यंत आणि विनोदी अभिनयापासून अ‍ॅक्शन स्टारपर्यंत सर्वच छटांमध्ये त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. त्यांच्या निधनाने एक मोठी पोकळी निर्माण झाली असून भारतीय सिनेमातील ‘ही-मॅन’चा निरोप अखेरचा ठरला.


Protected Content

Play sound