मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | रात्री फिरण्यासाठी गेलेल्या महिलेच्या हातातील मोबाईलसह हातातील अंगठी चोरट्यांनी ‘धुम स्टाईल’ने लांबवत पलायन केल्याची घटना शहरात घडली असून यामुळे चोरट्यांनी पोलिसांना आव्हान दिल्याचे मानले जात आहे.
या संदर्भातील वृत्त असे की, शहरातील गोदावरी नगरातील रहिवासी असणारे दिलीप मुरलीधर महानुभव हे आपल्या सौभाग्यवतीसह दिनांक १ रोजी रात्री फिरण्यासाठी गेले होते. फिरणे करून घरी येत असतांना रात्री सव्वाआठच्या सुमारास त्यांच्या सौभाग्यवतींनी मोबाईलवर कॉल आला. यानुसार, त्या फोनवर बोलू लागल्या. यानंतर काही मिनिटांमध्येच कोळंबे शाळेच्या समोरून हे दाम्पत्य चालत असतांना भरधाव मोटारसायकलवरून आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांच्या हातातील मोबाईलसह बोटातील अंगठ्या लांबवत पलायन केले. काही सेकंदात घडलेल्या या थरारामुळे त्यांनी मोठ्याने किंकाळी फोडली. यानंतर काही जणांनी त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना पोबारा करण्यात यश मिळाले.
या संदर्भात सदर महिलेचे पती दिलीप मुरलीधर महानुभव ( रा. गोदावरी नगर, मुक्ताईनगर) यांनी आज मुक्ताईनगर पोलीस स्थानकात फिर्याद दिली. यानुसार, संबंधीत चोरट्यांनी १३ हजार रूपये मूल्याचा मोबाईल आणि चार ग्रॅम वजनाची सुमारे २५ हजार रूपये मूल्य असणारी अंगठी अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याची फिर्याद दिली. यानुसार, मुक्ताईनगर पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अगदी रात्री आठ वाजता धुम स्टाईल या प्रकारात झालेल्या चोरीमुळे मुक्ताईनगरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून पोलिसांनी या प्रकरणी कठोर कार्यवाही करत चोरट्यांना शोधून काढण्याची मागणी आता होत आहे. तर धुम स्टाईलने चोरी करणार्यांचा बंदोबस्त करावा अशी अपेक्षा देखील आता व्यक्त करण्यात येत आहे.