जळगाव प्रतिनिधी । कोळसा बनविण्याच्या कारखान्यात गॅसने भरलेला बॉयलर फुटल्याने 46 वर्षीय कामगाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी 6 वाजेच्या सुमारास घडली. धरणगाव तालुक्यातील पिंप्रीजवळ ही कंपनी असून शवविच्छेदनासाठी मृतदेह जिल्हा रूग्णालयात दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धरणगाव तालुक्यातील पिंप्रीजवळी प्राईम एनर्जी नावाच्या कंपनीत नरोत्तम मारोती भोयार (वय-46) रा. निमगाव ता.जि. गोंदीया ह.मु. पिंप्री ता. धरणगाव हा ऑपरेटर म्हणून काम करतो. या कंपनीत लाकडापासून कोळसा बनविण्याचे काम केले जाते. नरोत्तम भोयार हा रात्र पाळीला कामाला होता. दरम्यान कंपनीत बॉयलर पेटवून आतील गॅस जास्त साठवून उच्च दाब झाल्यास तो गॅस एका वॉलद्वारे काढला जातो. आज सकाळी 6 वाजेच्या सुमारास वॉल बंद असतांना बॉयलर सुरू असतांना गॅस मोठ्याप्रमाणावर साठला गेल्याने अचानकपणे मोठा स्फोट झाला. या स्फोटात बॉयलरचा दरवाजा नरोत्तमच्या डोक्याला लागल्याने जागीच मृत्यू झाला. ही घटना घडताच सोबत काम करणार हेल्पर किसन मोरे यांनी तातडीने माहिती कंपनीचे मालक मुंबईस्थित नेम विरचंद सोनी यांना देण्यात आली. मयत नरोत्तमचा मृतदेहा जिल्हा शासकीय महाविद्यालयात आणण्यात आला. याबाबत जिल्हा पेठ पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून झीरो क्रमांकाने गुन्हा धरणगाव पोलीसात वर्ग करण्यात आला आहे.
मयत कामगार नरोत्तम भोयर हा गेल्या सहा महिन्यापासून ऑपरेटर म्हणून काम करत होता. त्याच्या पश्चात दोन भाऊ, एक बहिण, पत्नी, दोन मुले असा परीवार आहे. दरम्यान मयताच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळावी अशी मागणी नागरीकांकडून होत आहे.