जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । तालुक्यातील नागझिरा शिवारातील गिरणा नदीपात्रात गुरुवार १४ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता एका तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. याबाबत पोलिसात याबाबत तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. शुक्रवारी १५ डिसेंबर रोजी मायताची ओळख पटली असून मयत तरुण हा यावल तालुक्यातील बामनोद येथील रहिवासी असल्याचे समोर आले
गणेश सीताराम पाटील (वय ३५, रा. बामणोद ता. यावल) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. तो बामणोद गावात आई लीलाबाई, मोठा भाऊ संदीप, वहिनी, पुतण्यांसह राहत होता. संदीप हा भाजीविक्रेता असून त्याला मयत गणेश हा मदत करीत होता. जळगावात वडनगरी येथील मागील आठवड्यात झालेल्या प्रदीप मिश्रा यांच्या महाशिवपुराण कथेत गुरुवारी ७ डिसेंबर रोजी आईसोबत गणेश हादेखील गेला होता. दरम्यान कथा संपल्यावर ११ रोजी आई लीलाबाई यांना मुलगा गणेश दिसून आला नाही. त्यांनी शोधाशोध केली. मात्र मुलगा न मिळाल्याने लीलाबाई घरी बामणोद येथे परत आल्या.
गणेशच्या कुटुंबीयांनी त्याची शोधाशोध सुरु केली. पण तो मिळत नव्हता. दुसरीकडे जळगाव तालुका पोलीस स्टेशनला नागझिरा शिवारात गिरणा नदीपात्रात तरुणाचा मृतदेह मिळाला. तो त्यांनी शासकीय रुग्णालयात पाठविला. त्याची ओळख पटविण्यासाठी आवाहन केले. त्याचा तपास सुरु होता. दरम्यान, गणेशच्या कुटुंबीयांनी शुक्रवारी १५ रोजी सायंकाळी ५ वाजता जळगाव तालुका पोलीस स्टेशनला धाव घेत बेपत्ता झाल्याची नोंद करण्यास आले होते. तेव्हा पोलिसांनी त्यांना नदीपात्रात बुडून मृत्यू झालेल्या व्यक्तीचा फोटो दाखविला तसेच शासकीय रुग्णालयातील मृतदेह दाखविला तेव्हा गणेश पाटील याची ओळख पटली. तेव्हा कुटुंबीयांनी शोक व्यक्त केला.
तपासासाठी पोहेकॉ अनिल फेगडे, संजय भालेराव, अनिल मोरे यांनी परिश्रम घेतले. पुढील तपास पोहेकॉ लीलाधर महाजन करीत आहे.