पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पाचोरा तालुक्यातील वडगाव टेक येथे घडलेली एक अत्यंत हृदयद्रावक घटना संपूर्ण जिल्ह्यात शोकाकुल वातावरण निर्माण करणारी ठरली. अवघ्या १५ वर्षांची एक अल्पवयीन मुलगी नदीच्या पुरात वाहून गेली असून, तिचा मृतदेह तब्बल ४८ तासांनंतर सापडला. विशेष म्हणजे, घटनेचा धक्का बसल्यामुळे तिच्या चुलत आजोबांचाही हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
शुक्रवार, १९ सप्टेंबर रोजी दुपारी सुमारे २ वाजेच्या सुमारास वडगाव टेक गावातील निकिता भालेराव (वय १५) ही तिची मामी सरला विलास खरे (वय ३५) यांच्यासोबत हिवरा नदीपात्रातील केटीवेअर परिसरात कपडे धुण्यासाठी गेली होती. दरम्यान, निकिताचा पाय घसरल्याने ती थेट नदीच्या प्रचंड प्रवाहात वाहून गेली. हा प्रकार सरला खरे यांच्या लक्षात येताच त्यांनी तिला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्या स्वतःही पाण्यात अडकल्या. सुदैवाने गावातील प्रकाश पंडित भिल या मासेमारी करणाऱ्या युवकाने प्रसंगावधान राखून त्यांना वाचवले.

ही घटना समजताच गावातील माजी जि.प. सदस्य पदमसिंग पाटील आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. दुसरीकडे, निकिताच्या चुलत आजोबा शामराव विठ्ठल खरे (वय ६५) यांना घटनेची माहिती मिळताच तीव्र मानसिक धक्का बसून त्यांचा जागीच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. गावात एकाच कुटुंबावर आलेल्या दुहेरी संकटामुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
निकिताचा मृतदेह सापडावा यासाठी महापालिका प्रशासन, महसूल विभाग आणि ग्रामस्थांनी संयुक्तपणे शोध मोहिम हाती घेतली. आमदार किशोर पाटील यांनीही घटनास्थळी भेट देत संबंधित यंत्रणांना तातडीने पावले उचलण्याच्या सूचना दिल्या. स्थानिक पातळीवर युद्धपातळीवर चालवलेल्या शोध मोहिमेमुळे अखेर रविवारी, २१ सप्टेंबर रोजी सकाळी १०:४५ वाजता घटनास्थळापासून सुमारे ४ कि.मी. अंतरावर परधाडे शिवारात निकिता हिचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला.
मुलीचा मृतदेह सापडताच परिसरात शोककळा पसरली. ग्रामस्थांच्या उपस्थितीत अत्यंत शोकाकुल वातावरणात तिच्यावर तेथेच अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे वडगाव टेक आणि उत्राण परिसरात हळहळ व्यक्त होत असून, गावातील प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू आणि मनात व्यथाच आहे.



