अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील पातोंडा येथे गेल्या शुक्रवारी आणि शनिवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. पातोंडा-नांद्रीला जोडणाऱ्या लवण नाल्याला आलेल्या पुरात पाय घसरून वाहून गेलेले शेतकरी सर्जेराव संतोष बिरारी (वय ५५) यांचा मृतदेह अखेर मंगळवारी १९ ऑगस्ट रोजी दुपारी सापडला आहे. या घटनेमुळे बिरारी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

रविवारी १९ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास सर्जेराव बिरारी हे लवण नाल्याच्या पुरात वाहून गेल्याची घटना घडली होती. घटनेची माहिती मिळताच प्रांताधिकारी नितीन मुंडावरे आणि तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी पथकाने तात्काळ शोधकार्य सुरू केले. तसेच, ग्रामस्थांनीही पोहणाऱ्या व्यक्तींच्या मदतीने बिरारी यांचा शोध घेतला, मात्र दोन दिवसांपर्यंत त्यांचा शोध लागला नव्हता.

अखेर मंगळवारी १९ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास ग्रामस्थांना सर्जेराव बिरारी यांचा मृतदेह तरंगताना दिसला. ग्रामस्थांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली आणि मृतदेह बाहेर काढण्यात आला. पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी जी.एम. पाटील यांनी घटनास्थळीच शवविच्छेदन केले. त्यानंतर, सायंकाळी ७ वाजता शोकाकुल वातावरणात सर्जेराव बिरारी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
सर्जेराव बिरारी हे कुटुंबातील एकटे कर्ते पुरुष होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी, सून आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या अकाली निधनाने कुटुंबाचा आधार हरपला असून, त्यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे.



