जळगाव/बोदवड प्रतिनिधी । बोदवडातील नम्र फायनान्स कंपनीत दरोडा टाकून सुमारे 12 लाखांची रोकड लंपास करण्यात आली होती. या प्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, फायनान्स कंपनीतील मॅनेजर आणि कर्मचारीच्या मदतीने इतर पाच जणांनी मिळून ही रोकड लंपास केल्याचे उघड झाले आहे.
याबाबत माहिती अशी की, बोदवडातील येथील जामठी रस्त्यावर असलेली ठोंबरे दुग्धल्यायच्यावर असलेल्या नम्र फायनान्सच्या ऑफिस मध्ये रात्री ३ ते ३.३० वाजेच्या दरम्यान चोरांनी 12 लाख 8 हजार रुपये घेऊन पोबारा केला होता. ज्यावेळी चोरी झाली त्यावेळी फायनान्सचा कर्मचारी अमोल मोरे रोकड असलेल्या बाजूच्या रूममध्ये झोपलेला होता. विशेष म्हणजे नम्र फायनान्सचे ऑफिसचे दरवाजे रात्री उघडे होते असे कर्मचारी मोरे यांनी पोलीसांना सांगितले. ज्या रूममध्ये १२ लाख रुपयांची चोरी झाली त्याच्या शेजारीच नम्र फायनांसचा संबंधित कर्मचारी अमोल मोरे झोपलेला होता. कपाटाचा लॉक तोडून चोरी करण्यात आली होती. चोरी झाली त्यावेळेस मला कसलाही आवाज आला नाही किंवा या घटनेबद्दल काहीच माहित नाही असे मोरे याचे म्हणणे आहे. घटनेच्या ठिकाणी सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक संशयित नम्र फायनान्सच्या बाहेर तोंड बांधून हातात रॉड घेऊन फिरतांना दिसत होता. याप्रकरणी बोदवड पोलीसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
फायनान्स कंपनीचाच मॅनेजरच निघाला खरा सुत्रधार
नम्र फायनान्स कंपनीचे मॅनेजर मनोज धर्मराज माळी यांनी यापुर्वी अपघाती विमाचा अर्ज क्लेम म्हणून नम्र फायनान्स कंपनीतच अर्ज केला होता. तो अर्ज वरिष्ठांकडून नाकारण्यात आला होता. क्लेम पास न झाल्याचा राग मनात ठेवून मॅनेजर माळी यांनी कंपनीतीलच फिल्ड ऑफिसर सुनिल कडु इंगळे (वय-30) रा. निमखेडा ता.मुक्ताईनगर ह.मु. बोदवड यांच्या मदतीने कंपनीत दरोडा टाकण्याचा प्लॅन केला. यासाठी इंगळे यांनी संशयित आरोपी किसन उर्फ शेंड्या कैलास सोनवणे (वय-22), विलास मधुकर पवार (वय-24), प्रविण सुखा धुलकर उर्फ लहाण्या, गणेश सोपान पवार (वय 25) आणि प्रदीप किशोर सोनवणे (वय-20) सव रा. भिलवाडा ता. बोदवड यांच्या मदतीने 14 ऑक्टोबरच्या मध्यरात्री नम्र फायनान्समध्ये दरोडा टाकून सुमारे 12 लाख 8 हजार रूपयांचा माल लुटून नेला.
स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने केली कारवाई
पोलीस निरीक्षक बापु रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील पोउनि सुधाकर लहारे, अशेाक महाजन , पोहेकॉ रिवंद्र पाटील, अनिल जाधव, सुधाकर आंभोरे, अशरफ शेख, दिपक पाटील, दादाभाऊ पाटील, रणजित जाधव, इंद्रीस पठाण, अशोक पाटील, मुरलीधर बारी, शरद भालेराव, संदीप सावळे, वाहिदा तडवी, वैशाली महाजन यांनी मुक्ताईनगर, बोदवड, बुलढाणा आणि मलकापूर येथे रवाना झाले. यातील दिपक पाटील, रवि पाटील यांनी मोठ्या शिताफिने एकेकाला ताब्यात घेतले.
समान वाटणी करून खरेदी केल्या वस्तू
दरोड्यातील पाचही आरोपींनी समान वाटणी करून चांगलीच दिवाळी साजरी केली. एकाने नवीन पल्सर मोटारसायकल, दुसऱ्याने रेड मी मोबाईल विकत घेतला तर काहींहीन उसने पैसे दिले तर एकाने व्यवसायासाठी बकऱ्या खरेदी केल्या. यातील दुचाकी, मोबाईल आणि 70 हजार रोख हस्तगत करण्यात आले.