बोदवड प्रतिनिधी | येथील नगरपंचायत निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची आज शेवटची मुदत असल्याने उमेदवारांची मोठ्या प्रमाणात गर्दी उसळणार आहे.
बोदवड येथील नगरपंचायत निवडणूक २१ डिसेंबर रोजी होत आहे. यासाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. शनिवार आणि रविवारी सुटी असल्याने काल म्हणजेच सोमवारी उमेदवारांनी मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल केले. तर आज शेवटचा दिवस असल्यामुळे यापेक्षा जास्त गर्दी उसळण्याची शक्यता आहे.
बोदवड नगरपंचायतीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची ७ डिसेंबर ही शेवटची मुदत आहे. या दिवशी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणीही उमेदवारी अर्ज भरण्यापासून वंचित राहू नये यासाठी निवडणूक निर्णय अधिकार्यांनी दुपारी तीन ऐवजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत म्हणजेच २ तास वेळ वाढवून दिली. उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी पडताळणी समितीकडे सादर केलेल्या अर्जाची सत्य प्रत किंवा पडताळणी समितीकडे अर्ज केल्याबाबतचा पुरावा, विहित नमुन्यातील हमीपत्र सादर करण्यासाठी ८ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत मुदत असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी रामसिंग सुलाने यांनी दिली.