बोदवड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मुलबाळ होत नसल्याच्या कारणावरून विवाहितेचा छळ होत असल्याने तिने आत्महत्या करण्याची घटना घडली असून या प्रकरणी तिच्या पतीसह चुलत सासू-सासर्याच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील दोघांना अटक करण्यात आली आहे.
बोदवड शहरातील गोरक्ष नगरात मूलबाळ होत नसल्याच्या कारणावरून होणार्या छळास कंटाळून . भावना नीलेश महाजन (वय २७) या विवाहितेने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. भावनाचे लग्न नीलेश सुभाष महाजन (वय ३५) यांच्याशी सात वर्षांपूर्वी झाले. परंतु मूलबाळ होत नाही या कारणावरून पती, चुलत सासरे व सासू यांनी भावनाचा मानसिक व शारीरिक छळ करून क्रूर वागणूक देऊन आत्महत्येला प्रवृत्त केले, अशी फिर्याद भूषण अशोक माळी, रा.असोदा यांनी दिली.
त्यानुसार तिचा पती नीलेश महाजन, चुलत सासरे प्रकाश दौलत महाजन व चुलत सासू मंगला प्रकाश महाजन, सर्व रा. गोरक्षनाथ नगर बोदवड यांच्याविरुद्ध येथील पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी मयत महिलेचा पती नीलेश महाजन व चुलत सासरे प्रकाश महाजन यांना अटक करण्यात आली. चुलत सासू मंगला महाजन यांना अटक करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.