बोदवड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आज सर्व शासकीय कार्यालयांमध्ये शासनाच्या नियमानुसार शिवजयंती साजरी होत असतांना येथील सहायक निबंधक कार्यालयास मात्र याचा विसर पडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
राज्य शासनाच्या परिपत्रकानुसार प्रत्येक शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांमध्ये शिवजयंती साजरी करणे बंधनकारक आहे. यानुसार आज सर्व शासकीय कार्यालयांमधून छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्यात आले. मात्र येथील सहायक निबंधक कार्यालयास याचा विसर पडल्याचे दिसून आले आहे. आज सकाळपासून हे कार्यालय बंद असल्याने याबाबत कारवाई करण्यात येणार का ? हा मुद्दा उपस्थित झाला आहे.
या संदर्भात लाईव्ह ट्रेंडस न्यूजच्या प्रस्तुत प्रतिनिधीने या खात्याच्या कर्मचार्यांशी संपर्क साधला असता त्यांनी समाधानकारक उत्तरे न देता आपण बाहेरगावी असल्याचे सांगितले. तर याबाबत तहसीलदारांशी संपर्क साधला असता नियमानुसार शिवजयंती साजरी करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. यामुळे आता या प्रकरणी काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.