बोदवड प्रतिनिधी | नगरपंचायतीच्या आगामी निवडणुकीत आधीच्या निवडणुकीप्रमाणेच प्रभाग रचना कायम ठेवावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.
याबाबत वृत्त असे की, बोदवड नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या हालचाली सुरू झालेल्या असल्याने राजकीय वर्तुळात हालचाली सुरू झाल्या आहेत. दरम्यान, सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने नवीन मतदार यादी बनवणे, नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२१ च्या अनुषंगाने २०१६ मध्ये जी प्रभाग रचना होतो ती तशीच कायम ठेवण्यात यावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली असून तसेे निवेदन तहसीलदार प्रथमेश घोलप यांना देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, जे मतदार ज्या प्रभागात रहात आहेत त्यांचीच नावे त्या प्रभागामध्ये असावीत. जे बाहेरगावी राहणार आहेत, त्यांची नावे रद्द करावीत किंवा इतर कुठल्याही प्रभागात रहात असलेल्या नागरिकांनी त्यांचाच प्रभागात मतदान करावे. जेणेकरून होणारा गोंधळ कमी होईल, असे नमूद केले आहे.
हे निवेदन तहसीलदारांना देतांना संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष अशोक निकम, शहराध्यक्ष विशाल तांगडे, तालुका उपाध्यक्ष गजानन बेलदार, तालुका सचिव वैभव गावंडे ,तालुका संघटक संदीप संभाजीराव पाटील आदी उपस्थित होते.