बोदवड (प्रतिनिधी) तालुक्यातील नाडगाव परिसरातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था विविध समस्यांच्या विळख्यात अडकली आहे. काल (दि.१९) एका शिक्षकाने एका महिला कर्मचाऱ्यावर चाकू हल्ला केला होता. त्यामुळे यापुढे असे गैरप्रकार घडु नये म्हणून शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांनी आज (दि.२०) आयटीआयला भेट देवून प्राचार्यांना संबंधीत प्रकाराविषयी जाब विचारला.
ही औद्योगिक प्रशिक्षण संस्था विविध समस्यांच्या विळख्यात अडकली आहे. पुर्णवेळ प्राचार्य नसल्यामुळे प्रशिक्षण संस्थेच्या शिक्षक तसेच कर्मचारी यांची शिस्त बिघडली आहे. त्यामुळे यापुढे असे गैरप्रकार घडु नये म्हणून शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांनी आज (दि.२०) आयटीआयला भेट दिली. या दरम्यान विद्यार्थ्यांनी आयटीआयच्या भोंगळ कारभाराचा त्यांच्यासमोर पाढा वाचला. यानंतर पाटील यांनी आय.टी.आय.चे प्राचार्य यांना खडे बोल सुनावुन संबंधीत प्रकाराविषयी जाब विचारला. यासंदर्भात जिल्हा मुख्य शिक्षणाधिकारी यांनाही त्यांनी धारेवर धरले. तसेच राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांना फोनवरून संबंधीत प्रकार सांगितला. ग्रामीण भागातील मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला पुर्णवेळ प्राचार्य मिळावा, यासाठी शिवसेनेतर्फे प्रयत्न सुरु केले आहेत.
ही आय.टी.आय. विविध समस्यांच्या विळख्यात अडकली आहे. विद्यार्थ्यांना पाणीपुरवठा करणारी विहीर पुर्णपणे दुषित झाली आहे. यामुळे कित्येक विद्यार्थी आजारी पडल्याच्या घटना मागे घडल्या आहेत. पुर्णवेळ प्राचार्य नसल्यामुळे शिक्षक / कर्मचारी वर्ग कामात दिरंगाई करतात. एवढेच नव्हे तर शिक्षक कर्मचाऱ्यांची बायोमेट्रीक पद्धतीने हजेरी होत नाही. प्रशिक्षण संस्थेतील ९० टक्के पंखे गेल्या दोन वर्षापासुन बंद आहेत. कुंपण चारही बाजुने व्यवस्थित नसल्याने मागे लाखो रुपये किमतीच्या वस्तुंची चोरी प्रशिक्षण संस्थेतुन झाली होती. अश्या कित्येक समस्या येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आहेत. लोकप्रतिनिधींचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे.
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख अस्लम शेख, शिवसेना तालुकाप्रमुख गजानन खोडके, शहरप्रमुख हर्षल बडगुजर, शहर संघटक जितेंद्र पाटील, आकाश भिसे, नईम खान, योगेश राजपुत, योगेश पाटील, आकाश राजपुत, दिलीप पौळ, ऊमेश होळकर, शिवाजी अंबोरे, संजय सोनवणे, अमोल व्यवहारे यांच्यासहीत अन्य शिवसैनिक उपस्थित होते.