बोदवड, सुरेश कोळी | ”माझे बापजादे सधन होते….त्याचे वडील तर शिक्षक होते. आमच्याकडे आधीपासून प्रॉपर्टी होती. मात्र त्याने बाराशे कोटी रूपयांची प्रॉपर्टी कशी जमवली ?” असा सवाल करत बीएचआरचा घोटाळा समोर आल्यानेच आपल्यामागे ईडीची चौकशी लावण्यात आल्याचा गंभीर आरोप आज माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी येथील बैठकीत बोलतांना केला.
याबाबत वृत्त असे की, दोन दिवसांपासून एकनाथराव खडसे यांच्यावर ईडीची कारवाई झाली, त्यांना नोटीस बजावली याबाबत अफवा सुरू होत्या. त्यांची कन्या जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे यांनी दोन दिवसात नाथाभाऊ चाहत्यांशी संवाद साधतील असे जाहीर केले होते. या अनुषंगाने आज नाथाभाऊ बोदवड येथील कार्यक्रमाला उपस्थित राहिले. याप्रसंगी त्यांनी ईडीच्या कारवाईबाबत भाष्य केले. ही मूळ बातमी लाईव्ह ट्रेंडस न्यूजची आहे.
खडसे म्हणाले की, माझे बापजादे श्रीमंत होते. त्यांची मोठी शेतजमीन आणि वाडे होते. याचे आधीपासूनचे उतारे आहेत. आपण कधीही भाड्याच्या घरात राहणारे नव्हतो. मात्र आ. गिरीश महाजनांचा उल्लेख न करता ते पुढे म्हणाले की, त्याचे वडील शिक्षक असतांनाही आज त्याची प्रापर्टी बाराशे करोड कशी ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. बेनामी संपत्तीचा विचार करता हा आकडा अजून मोठा असल्याचा आरोप त्यांनी केला. ज्याप्रमाणे एखाद्याचा जीव हा पोपटात असल्याचे म्हटले जाते. याच प्रमाणे त्यांचा जीव हा बीएचआरमध्ये असल्याने आपल्यावर ईडीची कारवाई करण्यात आल्याचा आरोप खडसे यांनी याप्रसंगी केला.
या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील आणि जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणीताई खडसे यांची उपस्थिती होती.