महावितरणचे सहव्यवस्थापकीय संचालक बोडके यांनी केले राणे यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन

जळगाव प्रतिनिधी । महावितरणचे दिवंगत तंत्रज्ञ गजानन राणे यांच्या कुटुंबीयांची आज महावितरणच्या कोकण प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक गोविंद बोडके यांनी भेट घेऊन सांत्वन केले.

ऊर्जामंत्री ना.डॉ.नितीन राऊत आणि महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांच्या सूचनेनुसार सहव्यवस्थापकीय संचालक गोविंद बोडके यांनी जळगाव येथे भेट देऊन राणे यांच्या मृत्यू प्रकरणी माहिती घेतली. या दुःखद प्रसंगी महावितरण प्रशासन राणे कुटुंबीयांच्या पाठीशी ठाम उभे असून, मृत्युपश्चात कर्मचाऱ्यांच्या अवलंबितांना देय असलेले सर्व लाभ हे राणे यांच्या अवलंबितांना लवकरात लवकर दिले जातील, असे आश्वासन गोविंद बोडके यांनी यावेळी दिले. यावेळी महावितरणच्या जळगाव परिमंडलाचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर, जळगाव परिमंडलाचे अधीक्षक अभियंता फारूक शेख, जळगाव परिमंडलाचे उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी अरुण शेलकर उपस्थित होते. 

 बोडके यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांची भेट घेऊन महावितरणच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना भविष्यात कोणत्याही व्यक्तीकडून मारहाण होणार नाही, याबाबत ठोस पावले उचलण्याची विनंती केली. भडगाव उपविभाग कार्यालयात घडलेल्या घटनेतील संशयित आरोपींना लवकरात लवकर अटक करावी, अशी सूचनाही त्यांनी केली. तसेच जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याशी भ्रमणध्वनीवर चर्चा करून महावितरणच्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेबाबत जिल्हा प्रशासनाने ठोस कार्यवाही करण्याची विनंती केली. महावितरणमधील सबऑर्डिनेट इंजिनिअर्स असोसिएशन व बहुजन विद्युत अभियंता अधिकारी व कर्मचारी फोरम संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबतही बोडके यांनी चर्चा करून त्यांच्या शंकांचे निरसन केले.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.