पब्जी खेळण्यासाठी डाटा अपुरा : तरूणाने संपविली जीवनयात्रा !

बोदवड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | वडिलांनी पब्जी गेम खेळण्यासाठी मोबाईल दिला तरी डाटा अपुरा पडल्यानंतर रिचार्ज करून न दिल्याने एका तरूणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना येथे घडली आहे.

या संदर्भातील वृत्त असे की, शहरातील दत्त कॉलनीमधील रहिवासी सुरेश सखाराम माळी (वय ५१) यांचा तरुण मुलगा अजय सुरेश माळी याला मोबाईलवर पब्जी खेळण्याची आवड होती. यासाठी सुरेश माळी यांनी त्याला नुकताच स्मार्टफोन घेऊन दिला होता. मात्र त्यातीला डाटा लागलीच संपल्याने त्याने वडिलांकडे रिचार्जसाठी आग्रह धरला. वडिलांनी त्याला थोडे थांबण्याचे सांगितले. ही घटना १० जुलै रोजी घडली. तेव्हापासून अजय माळी हा घरातून निघून गेला होता.

अजयच्या कुटुंबियांनी त्याचा खूप शोध घेतला असता तो आढळला नाही. त्यामुळे या संदर्भात बोदवड पोलिसांत तो हरवल्याची तक्रार दिली होती. दरम्यान १२ रोजी रूप नगरामधील प्रभाग क्रमांक तीनमध्ये खाटीक समाज मंदिराजवळील विहिरीत अजय याचा मृतदेह आढळून आला. या प्रकरणी सुरेश माळी यांच्या फिर्यादीवरून येथील पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलिस युनूस तडवी करत आहे.

पब्जी खेळण्यासाठी रिचार्ज करून न दिल्यानेच त्याने जीवनयात्रा संपविल्याचे दिसून आल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

Protected Content