बोदवड-सुरेश कोळी | येथील कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक स्थगित करण्यात आली असून याबाबतचे शासकीय परिपत्रक देखील जारी करण्यात आले आहे.
या संदर्भातील वृत्त असे की, जिल्ह्यातील ११ कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुका आगामी काळात होत असून याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. बोदवड बाजार समितीच्या अंतर्गत मुक्ताईनगर आणि वरणगाव येथील उपबाजार यांचा देखील अंतर्भाव करण्यात आलेला आहे. यातील वरणगाव उपबाजाराला भुसावळ बाजार समितीला जोडण्यात यावे असा प्रस्ताव आधी सादर करण्यात आला होता. राज्याच्या सहकार खात्याने याला मंजुरी दिली आहे. याबाबतचे परिपत्र क देखील जारी करण्यात आले आहे.
या अनुषंगाने बोदवड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अंतर्गत असलेल्या वरणगाव उपबाजाराला भुसावळशी जोडण्यात येत असल्याने येथील निवडणूक तूर्तास स्थगित करण्यात येत असल्याचे या परिपत्रकार नमूद करण्यात आले आहे. बोदवड सोबत राज्यातील खुलताबाद, कुंटुर आणि आष्टी येथील निवडणुका देखील स्थगित करण्यात आल्याचे या परिपत्रकात म्हटले आहे.
यामुळे बोदवड बाजार समितीतील वरणगाव उपबाजार हा भुसावळला जोडण्यात येणार असून ही प्रक्रिया जिल्हा उपनिबंधकांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार आहे. यानंतरच बोदवड बाजार समितीची निवडणूक होणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. तर, सहकार विभागाच्या या निर्णयामुळे निवडणुकीसाठी अर्ज दाखल केलेल्यांचा मात्र हिरमोड झाल्याचे दिसून येत आहे.