वाशिम येथे मनोज जरांगे पाटील यांना दाखवले काळे झेंडे

वाशिम-वृत्तसेवा ।  राज्यात सध्या मराठा विरूद्ध ओबीसी आरक्षणचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. राज्य सरकारला मनोज जरांगे पाटलांनी २ जानेवारी पर्यंत मुदत दिली आहे. तर सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊ नये, या मागणी साठी ओबीसी समाज रस्त्यावर उतरला आहे. यातच वाशिम येथे मनोज जरांगे पाटलांना काळे झेंडे दाखवण्यात आले आहेत. त्यामुळे हा वाद आणखी पेटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मनोज जरांगे पाटलांच्या सभा सध्या संपुर्ण महाराष्ट्रात होत आहेत. यातच मनोज जरांगे पाटलांची वाशिम येथे सभा होत असताना त्याठिकाणी जातांना त्यांना वाशिम जिल्ह्यातील तामसा फाट्यावरील काठा इथे काळे झेंडे दाखवण्यात आले आहे. पोलिसांनी काळे झेंडे दाखवणाऱ्या ओबीसी कार्यकर्त्यांना रोखलं आहे.

दरम्यान, मराठा आरक्षणावरून मराठा समाजाने सुरूवातीपासून आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्यातील मंत्री, आमदार खासदारांच्या ताफ्याला मराठा समाजाकडून काळे झेंडे दाखवण्यात येत आहे. परंतु यातच आता मनोज जरांगे पाटलांना काळे झेंडे दाखवण्यात आल्याने आता वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.

Protected Content