गांधीनगर वृत्तसंस्था | मुख्यमंत्री निवडीत धक्का दिल्यानंतर आता भाजपने भूपेंद्र पटेल यांच्या मंत्रीमंडळात सर्वच्या सर्व २४ नवीन मंत्र्यांची निवड केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. तर आता नाराज नेत्यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.
भूपेंद्र पटेल यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आज २४ नव्या मंत्र्यांनी शपथ घेतली. विशेष म्हणजे रुपाणी यांच्या मंत्रिमंडळातील एकाही मंत्र्याला स्थान देण्यात आलेलं नाही. या मंत्रिमंडळात एकूण २४ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यात १० जणांना कॅबिनेट मंत्रिपद, तर १४ जणांना राज्यमंत्रिपद देण्यात आलं आहे.
नव्या मंत्रिमंडळात माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या मंत्रिमंडळातील २२ मंत्र्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. यात माजी उप मुख्यमंत्री नितीन पटेल यांचाही समावेश आहे. ते आधीच मुख्यमंत्रीपद न भेटल्याने नाराज असतांना आता मंत्रीपदही न मिळाल्याने आता ते काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.