भाजपची पाचवी यादी जाहीर; दिग्गजांचा आहे समावेश

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | आगामी लोकसभा निवडणूकीसाठी आपल्या उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली आहे. या यादीत १७ राज्यातील १११ मतदारसंघासाठी उमेदवारांची नावे घोषित करण्यात आली आहे. भाजपच्या या पाचव्या यादीत २० महिलांचीही नावे आहेत. भाजपच्या या पाचव्या यादीत राज्यानुसार पश्चिम बंगालमधून १९, ओडिशातून १८, उत्तर प्रदेशमधून १३, बिहारमधून १७, राजस्थानमधून ७, आंध्र व गुजरातमधून प्रत्येकी ६, हरियाणा-कर्नाटक-केरळमधून प्रत्येकी ४, हिमाचल-तेलंगणा २, झारखंड-महाराष्ट्रातून प्रत्येकी ३ आणि गोवा-मिझोराम- सिक्कीममधून प्रत्येकी एक नाव आहे.

यातील चर्चित नावांचा विचार केल्यास अभिनेत्री कंगना राणावतला हिमाचल प्रदेशातील मंडीतून उमेदवारी, रामायणात रामाची भूमिका अरुण गोविल यूपीच्या मेरठमधून उमेदवारी, १० वर्षे काँग्रेसचे खासदार असलेले उद्योगपती नवीन जिंदाल हरियाणातील कुरुक्षेत्र येथून उमेदवारी, उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अभिजित गंगोपाध्याय यांना तमलूकमधून उमेदवारी, वरूण गांधी यांच्या जागेवर पीलीभीमधून यूपी सरकारचे मंत्री जितिन प्रसाद यांना उमेदवारी, ८ वेळच्या खासदार वरूण गांधी यांच्या आई मनेका गांधी यांना सुलतानपूरमधून उमेदवारी, केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान ओडिशातील संभलमधून उमेदवारी, आंध्रचे माजी मुख्यमंत्री एन. किरणकुमार रेड्डी हे राजमपेटमधून उमेदवारी, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टार बेळगावमधून उमेदवारी, शिबू सोरेन यांची सून सीता सोरेन यांना दुमकामधून उमेदवारी, भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांना पुरीमधून उमेदवारी देण्यात आली आहे.

या यादीत महाराष्ट्रातील तीन मतदारसंघासाठी उमेदवारी घोषित करण्यात आले आहे. यामध्ये सोलापूरमधून राम सातपूते, भंडारा-गोंदियामधून सुनील मेंढे, गडचिरोली-चिमूरमधून अशोक नेते यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपने आतापर्यंत ४०३ मतदारसंघातून आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहे.

Protected Content