
ठाणे-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा। मुंबईच्या वेशीवर असलेल्या अंबरनाथ शहरातून एक धक्कादायक आणि देशपातळीवर लक्ष वेधून घेणारी राजकीय घडामोड समोर आली आहे. शिवसेना शिंदे गटाला बाजूला ठेवत भारतीय जनता पार्टीने थेट काँग्रेससोबत युती करत अंबरनाथ नगरपरिषदेत सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा केला आहे. या अनपेक्षित राजकीय समीकरणामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून महायुतीतील अंतर्गत तणावही उघडपणे समोर आला आहे.

अंबरनाथ नगरपरिषदेत भाजपने शिंदे गटाला धक्का देत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यासोबत हातमिळवणी केली आहे. भाजपचे 16, काँग्रेसचे 12 आणि अजित पवार गटाचे 4 असे एकूण 32 नगरसेवक एकत्र येत भाजप बहुमतात येणार आहे. विशेष म्हणजे “काँग्रेसमुक्त भारत”ची घोषणा करणाऱ्या भाजपनेच आता काँग्रेससोबत युती केल्याने विरोधकांना टीकेची संधी मिळाली आहे.
या राजकीय घडामोडीवर शिवसेना शिंदे गटाकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. ही युती अभद्र असल्याचा आरोप करत शिंदे गटाने भाजपवर जोरदार टीका केली आहे. भाजपने काँग्रेसशी हातमिळवणी करत शिवसेनेचा घात केल्याचा आरोप शिंदे गटाचे आमदार बालाजी किणीकर यांनी केला. ही युती शिंदे गटाच्या चांगलीच जिव्हारी लागल्याचे चित्र आहे.
दरम्यान, भाजपकडून या आरोपांना प्रत्युत्तर देण्यात आले आहे. भाजप उपाध्यक्ष गुलाबराव करंजुळे पाटील यांनी स्पष्टपणे सांगितले की, गेल्या 25 वर्षांपासून भ्रष्टाचार करणाऱ्या शिंदे गटासोबत सत्तेत बसलो असतो, तर तीच खरी अभद्र युती ठरली असती. अंबरनाथ नगरपरिषदेसाठी शिवसेना शिंदे गटासोबत महायुतीच्या माध्यमातून चर्चा करण्याचा अनेकदा प्रयत्न करण्यात आला, मात्र त्यांच्या नेत्यांकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही, असा दावाही त्यांनी केला.
अंबरनाथ नगरपरिषद निवडणूक ही भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासाठी प्रतिष्ठेची लढत ठरली होती. नगराध्यक्षपदासाठी भाजपच्या तेजश्री करंजुळे पाटील आणि शिंदे गटाच्या मनिषा वाळेकर यांच्यात चुरशीची लढत झाली होती. अखेर भाजपच्या तेजश्री करंजुळे या नगराध्यक्षपदी विजयी झाल्या.
महत्त्वाचे म्हणजे, नगराध्यक्षपद भाजपकडे गेले असले तरी नगरसेवकांच्या संख्येत शिवसेना शिंदे गट आघाडीवर राहिला आहे. 59 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत शिंदे गटाने सर्वाधिक 23 जागांवर विजय मिळवला, मात्र बहुमताअभावी सत्तेपासून दूर राहावे लागले. भाजपने 16, काँग्रेसने 12 आणि अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीने 4 जागा जिंकल्या होत्या.
शिंदेसेनेला बाजूला ठेवून भाजप–काँग्रेस युतीचा प्रयोग अंबरनाथमध्ये प्रत्यक्षात येत असल्याने, आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर याचे दूरगामी परिणाम होतील, असा राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे. ही घडामोड केवळ अंबरनाथपुरती मर्यादित न राहता महाराष्ट्राच्या राजकारणात नवे समीकरण निर्माण करणारी ठरण्याची चिन्हे दिसत आहेत.



