भाजपचे घंटानाद आंदोलन म्हणजे राजकीय स्टंटबाजी

भुसावळ, प्रतिनिधी । रविवार झालेल्या भाजपच्या घंटानाद आंदोलनात सहभागी कार्यकर्त्यांनी मंदिराबाहेर पादत्राणे बाहेर न काढता मंदिरांच्या गाभाऱ्यात प्रवेश केल्याने तमाम हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत त्यामुळे या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करून कारवाई करावी अशी मागणी भुसावळ तालुका शिवसेनेने केली आहे.

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देश व राज्यभरातील सर्व धार्मिक स्थळे केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार बंद आहेत . हे माहीत असून सुद्धा कोरोना काळात जनजागृती न करता भाजपचे दांभिक पदाधिकारी देवा धर्माचा आधार घेवून कुटील राजकारण खेळण्याचा प्रयत्न करीत आहे . २९ ऑगष्टरोजी भाजप खासदार श्रीमती रक्षा खडसे , राष्ट्रीय बेटी बचाव बेटी पढाव समितीचे डॉ.राजेंद्र फडके , अशोक कांडेलकर व इतर पदाधिकारी कार्यकर्ते यांनी लाखो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान आसलेल्या संत मुक्ताई साहेब यांच्या पवित्र मंदिराच्या गाभाऱ्याजवळ घंटानाद व शंखनाद आंदोलन केले . हे आंदोलन करीत असताना त्यांनी गाभाऱ्याजवळ चक्क चपला घातलेल्या दिसून येत आहे . यामुळे महाराष्ट्रातील तमाम वारकरी व हिंदू धर्मियात प्रचंड संतापाची लाट निर्माण झालेली आहे

राजकीय स्टंटबाजीसाठी हिंदूधर्मियांच्या भावनांशी खेळणाऱ्या या भाजप पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल . याची नोंद घ्यावी , असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. याप्रसंगी शिवसेनेचे तालुकाप्रमुख समाधान महाजन उपजिल्हा संघटक विलास मुळे, वाहतूक सेना जिल्हासंघटक ऍड श्रीश्याम गोंदेकर, तालुका संघटक प्रा. धीरज पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख संतोष सोनवणे, शहरप्रमुख बबलू बऱ्हाटे, शहर प्रमुख निलेश महाजन, माजी नगरसेवक दीपक धांडे, धनराज ठाकूर उपशहरप्रमुख पवन नाले, माजी नगरसेवक कैलास लोखंडे,राहुल सोनटक्के, शहर संघटक योगेश बागुल, नबी पटेल, उपजिल्हा संघटक अल्पसंख्यांक सईद मुल्लाजी, कैलास पाटील राहुल बावणे उपस्थित होते.

Protected Content