औरंगाबाद । कोविड नंतर राज्यात भाजपचीच सत्ता येणार असल्याचा आशावाद भाजपचे ज्येष्ठ नेते केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी एका कार्यक्रमात व्यक्त केला आहे. याप्रसंगी त्यांनी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांना जोरदार टोले लगावले.
राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी शिवसेनेत यावे अशी खुली ऑफर दिली. या पार्श्वभूमिवर, सत्तार यांच्यासोबत एका कार्यक्रमात बोलतांना रावसाहेब दानवे यांनी जोरदार फटकेबाजी केली. ते म्हणाले की, अब्दुल सत्तारांची सासरवाडी भोकरदन तर माझी सासरवाडी सिल्लोड आहे. राजकारणात कोणी कोणाचा शत्रू नाही आणि मित्र नाही. अब्दुल सत्तारसारखा नेता महाराष्ट्रात नाही, सगळ्यांना मदत करतो आणि निवडून आल्यावर नावं ठेवतो. यावेळेला मी तुम्हाला मदत केली नाही कारण मला याआधीच माहिती होतं शिवसेना काय करणार आहे.
दानवे पुढे म्हणले की, कोविड संपल्यावर आपलीच सत्ता येईल. कोविड संपलं की सत्तार मला भेटायला भोकरदनला येतील आणि बोलतील फडणवीसांना भेटायला जाऊया…अब्दुल सत्तारांची आणि आमची दोस्ती खूप चांगली आहे. एकमेकांना मदत करतो. यापुढेही मदत करतील. अब्दुल सत्तार शिवसेनेत राहतील याची गॅरेंटी कुठे आहे? पहिले अपक्ष, मग काँग्रेस आणि आता शिवसेनेत.. असे म्हणत दानवे यांनी अब्दुल सत्तारांना काढला.