नंदूरबारमध्ये भाजपला धक्का; मोठा नेता तुतारी फुंकणार !

नंदूरबार-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत असून अनेक नेत्यांनी राज्यात दौरे सुरू केले आहेत. महायुती व महाआघाडीत घटक पक्षांमध्ये जागावाटपाच्या चर्चा सुरू असतानाच अनेक नेते पक्ष बदलत आहेत. शरद पवारांनी अनेक नेत्यांना गळाला लावत महायुतीसमोर मोठं आव्हान निर्माण केलं आहे. आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नंदूरबारमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. मंत्री विजयकुमार गावित यांचे भाऊ आणि भाजपा प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्रकुमार गावित यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत शहादा-तळोदा मतदारसंघातून आगामी निवडणूक लढण्याचा इरादा जाहीर केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार राजेंद्र गावित कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे. मात्र महायुतीत भाजपकडून तिकीट मिळणार नसल्याची खात्री असल्याने त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. शहादा-तळोदा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास राजेंद्रकुमार गावित इच्छूक आहे. मात्र येथून भाजपचे राजेश पाडवी आमदार आहेत. आगामी निवडणुकीतही भाजपकडून त्यांनाच उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

राजेंद्रकुमार गावित यांनी २०१४ ची विधानसभा निवडणूक राष्ट्रवादीकडून लढवली होती. मात्र त्यात त्यांचा ११ हजार मतांनी पराभव झाला होता. निवडणुकीनंतर त्यांनी राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. २०१९ मध्ये त्यांनी निवडणूक लढण्याची तयारी केली होती, मात्र भाजपने शहादा-तळोदा विधानसभा मतदारसंघातून राजेश पाडवींना तिकीट दिलं. यामुळे आता गावीत पुन्हा स्वगृही परतण्याची शक्यता आहे. शहाद्यात राजेंद्रकुमार गावित यांचा मोठा कार्यकर्ता गट आहे. गावित दुसऱ्या पक्षात गेल्यास भाजपला येथे मोठा धक्का बसू शकतो. त्यातच चर्चा सुरू आहे की, राजेंद्रकुमार गावित शरद पवार गटात जाण्याची शक्यता आहे.

Protected Content