शिवसेनेला गमावल्याची भाजपाला मोठी किंमत चुकवावी लागेल : संजय राऊत

sanjay raut

मुंबई (वृत्तसंस्था) २०१४ मध्ये युती तुटली होती. त्यानंतर आम्हाला युतीत जायची इच्छा नव्हती. भाजपाने त्यांचा सर्वात मोठा मित्रपक्ष गमावला आहे. भाजपाच्या अंताची सुरूवात ही महाराष्ट्रातूनच होणार आहे. येत्या काळात भाजपाला याची मोठी किंमत चुकवावी लागेल,अशी टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली आहे.

 

संजय राऊत म्हणाले की, राज्यात लवकरच सरकार स्थापन होईल आणि त्याचं नेतृत्व हे शिवसेनाच करेल. शिवसेनेच्या नेतृत्वाखालीच स्थिर सरकार स्थापन होईल आणि यासाठी कोणाच्याही मध्यस्थीची गरज नाही. आम्ही विधीमंडळात बहुमत सिद्ध करताना १७० जणांचा पाठिंबा दाखवून देऊ. राष्ट्रपती शासन हे सहा महिन्यांसाठी लागू झाले आहे. ते संपण्यापूर्वी राज्यात सरकार स्थापन होईल. सत्तास्थापनेचा गोंधळ हा शिवसेनेच्या मनात नाही. तो केवळ माध्यमांच्या मनात आहे, असे म्हणत राऊत यांनी माध्यमांवरही टीका केली.

 

राज्याच्या निवडणुकांचे निकाल लागून बराच कालावधी उलटला आहे. तरी राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. अशातच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. एकीकडे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी सत्तास्थापनेसाठी पुढाकार घेतला असला तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या वक्तव्यांमुळे सत्तास्थापनेचा पेच अद्यापही सुटल्याचं दिसत नाही. अशातच संजय राऊत यांनी राज्यात शिवसेनाच सरकार स्थापन करेल असा विश्वास व्यक्त करत भाजपाच्या अंताची सुरूवात ही महाराष्ट्रातूनच सुरू होणार असल्याचा घणाघात केला.

Protected Content