
सावदा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । सावदा शहरात स्मार्ट मीटर बसविण्याच्या मोहिमेमध्ये होत असलेल्या गंभीर गैरव्यवहाराचा पर्दाफाश झाला असून, नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना महायुतीच्या वतीने महावितरण विभागाला ठेकेदाराविरोधात तात्काळ आणि कठोर कारवाई करण्याचे निवेदन देण्यात आले आहे.

महावितरणच्या ठेकेदारांकडून कोणतीही पूर्वसूचना न देता नागरिकांच्या घरांमध्ये जबरदस्तीने स्मार्ट मीटर बसविण्यात येत असून, त्यास विरोध करणाऱ्यांना खोट्या कायदेशीर कारवाईची धमकी दिली जात आहे. एवढेच नव्हे तर, पैशांची उकळपट्टी करून नागरिकांची फसवणूक केल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. या प्रकारामुळे संपूर्ण शहरात संतप्त वातावरण पसरले असून, नागरिकांच्या रोषाला आता राजकीय पाठींबा मिळाला आहे.
या संदर्भात भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना महायुतीच्या शिष्टमंडळाने महावितरणच्या सावदा कार्यालयात कार्यकारी अभियंत्यांना निवेदन दिले. निवेदनात स्मार्ट मीटर बसवण्याची मोहीम तात्काळ थांबवावी, वाढलेल्या बीलांच्या तक्रारींचे त्वरित निराकरण करावे, चुकीचे रीडिंग देणारे मीटर तत्काळ बदलावे, तसेच लाच घेताना पकडलेल्या ठेकेदाराची सखोल चौकशी करून त्याचे कंत्राट रद्द करावे अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या.
याशिवाय, संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकून त्याला भविष्यात कोणतेही कंत्राट न देण्याची मागणीही करण्यात आली आहे. महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला की, जर वरील मागण्या तातडीने पूर्ण झाल्या नाहीत, तर तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल आणि त्यातून उद्भवणाऱ्या परिणामांची जबाबदारी महावितरणवर राहील.
या निवेदन प्रसंगी माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी, शिवसेनेचे सूरज परदेशी, जे. के. भारंबे, नंदाबाई लोखंडे, महेश अकोले, लीना चौधरी यांच्यासह महायुतीचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. शहरात पारदर्शक आणि उत्तरदायी वीज वितरण व्यवस्था प्रस्थापित करण्याची मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून जोर धरत आहे.



