विद्यापीठ कायदा सुधारणा विधेयकाचा भाजयुमोतर्फे निषेध

जळगाव प्रतिनिधी । महाविकास आघाडी सरकारने पारित केलेल्या विद्यापीठ कायद्याच्या निषेधार्थ भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने पांडे चौकातील मुख्य टपाल कार्यालयासमोर घोषणाबाजी करून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना २ हजार पत्र पाठवून निषेध व्यक्त करण्यात आला.

भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, राज्यातील महाविकास आघाडी सरकारने विद्यापीठ कायदा पारित करून विद्यार्थ्यांची राखरांगोळी केली आहे. विद्यापीठा कायदा सुधारणा विधेयक हे महाविकास आघाडीने घाई घाईने घेतलेला निर्णय आहे. या काळ्या विधेयकाच्या माध्यमातून प्र. कुलपती हे नवीन पद तयार करून कुलपतींचे अधिकारी उच्च तंत्र शिक्षणमंत्री यांना देण्यात येणार आहे. विद्यापीठांना राजकरणाचा अड्डा बनविण्याचा प्रयत्न केला जात आहे. भविष्यात कुलगुरूंच्या नियुक्ती, विद्यार्थ्यांच्या पदव्या, आरोग्य सेवक भरती परिक्षा, म्हाडा परिक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. याच्या निषेधार्थ सोमवारी १० जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता पांडे चौकातील मुख्य टपाल कार्यालयासमोर भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना भारतीय जनता युवा मोर्चा आणि विद्यार्थ्यांच्या वतीने २ हजार पत्र पाठविण्यात आले.

भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील, युवा मोर्चा महानगर जिल्हाध्यक्ष आनंद सपकाळे यांच्या सुचनेनुसार हे पत्र पाठविण्यात आले आहे. याप्रसंगी महाबळ परिसरातील भारतीय जनता युवा मोर्चा मंडल क्रमांक ९ चे प्रमुख गौरव पाटील, चिटणीस रोहित सोनवणे, सरचिटणीस प्रथम पाटील, विपुल तायडे, विनायक तिवारी, असीम शेख यांच्यासह मंडलचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.

 

 

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!