नवी दिल्ली प्रतिनिधी । राज्यात विधानसभा निवडणुकीचे रण तापले असून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, अद्याप भाजप-शिवसेना युती जागावाटपावर अडलेली आहे. आज भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होणार आहे. त्यात युतीच्या जागावाटपावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीत आज भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे. त्यात भाजपची युतीबाबतची भूमिका स्पष्ट होईल. शिवसेनेसोबतच्या जागावाटपावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे, असे ही सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत महाराष्ट्रासह हरयाणातील विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या यादीवर अंतिम निर्णय होईल, असेही सांगण्यात आले आहे. या बैठकीत पंतप्रधान मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहा, कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि अन्य वरिष्ठ नेते उपस्थित असणार आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार आदी नेतेही उपस्थित राहणार आहेत, असे समजते आहे.