मुंबई प्रतिनिधी । खान्देशातील लोकसभेच्या उमेदवारीबाबत आज मुंबईत भाजप नेत्यांनी सखोल चर्चा केल्याचे वृत्त आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर, भाजपतर्फे आज सलग दुसर्या दिवशी विविध जागांबाबत चर्चा सुरू आहे. या अनुषंगाने आज खान्देशातील चार लोकसभा मतदारसंघातील जागांबाबत चर्चा करण्यात आली. या चारही जागा सध्या भाजपकडे असून यांना कायम राखण्याचे आव्हान पक्षासमोर आहे. यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आज खान्देशातील नेत्यांची मते जाणून घेतली. यात महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री एकनाथराव खडसे, पर्यटन मंत्री जयकुमार रावल, खासदार ए.टी. पाटील, आमदार राजूमामा भोळे, आमदार स्मिताताई वाघ, आमदार चंदूलाल पटेल, माजी आमदार डॉ. गुरूमुख जगवाणी आदी नेते उपस्थित होते. या चर्चेचा तपशील बाहेर आला नसला तरी या बैठकीत विविध आयामांमधून सविस्तर चर्चा करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.