जळगाव प्रतिनिधी । आज भाजपच्या लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर होणार असून यात जळगाव व रावेरचा समावेश असणार का ? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेससह अन्य पक्षांनी आपापले उमेदवार जाहीर करण्यास प्रारंभ केला असतांना भाजपने मात्र अद्याप आपले पत्ते उघडले नाहीत. या पार्श्वभूमिवर, आज सायंकाळी भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. यात देशभरातल्या विविध राज्यांमधील १८० जागांचा समावेश असू शकतो. ही यादी जाहीर करण्याआधी दिल्लीत भाजपच्या संसदीय मंडळाची बैठक होणार असून यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची उपस्थिती राहणार आहे. या बैठकीत उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार असून सायंकाळी ही यादी जाहीर होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान, भाजपच्या या पहिल्या यादी जळगाव व रावेर मतदारसंघातील उमेदवारांची नावे असतील काय ? याबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. राष्ट्रवादीने आधीच जळगावसाठी गुलाबराव देवकर यांना उमेदवारी दिली असून रावेरच्या जागेचा सस्पेन्स कायम आहे. यामुळे आज सायंकाळी भाजपचे उमेदवार आणि रावेरच्या जागेसाठी विरोधी पक्षांच्या उमेदवारीबाबत उलगडा होणार का ? या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच आज काँग्रेसची राज्यासाठी दुसरी तर राष्ट्रवादीची तिसरी यादीदेखील आजच जाहीर होऊ शकते.