इटानगर वृत्तसंस्था । अरूणाचल प्रदेशातील दोन मंत्र्यांसह आठ आमदारांनी भाजपला रामराम ठोकून नॅशनल पीपल्स पार्टीमध्ये प्रवेश केला आहे.
अरूणाचल प्रदेशात लोकसभेसोबत विधानसभेचीही निवडणूक होत आहे. या पार्श्वभूमिवर भाजपला जोरदार हादरा बसला आहे. या राज्यात विधानसभेच्या ६० जागा आहेत. ११ एप्रिल रोजी या राज्यात मतदान होणार असून भाजपाचे पेमा खांडू हे राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने नुकतीच ५४ जागांसाठी उमेदवारी जाहीर केली होती. यानंतर भाजपाचे ८ आमदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत नॅशनल पीपल्स पार्टीत प्रवेश केला. अरुणाचलमधील भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष जारपूम गामलिन, गृहमंत्री कुमार वाय, पर्यटन मंत्री जारकर गामलिन या प्रमुख नेत्यांनी भाजपाला सोडचिठ्ठी दिली आहे. भाजपाचे विद्यमान ८ आमदार आणि १२ पदाधिकारी असे एकूण २० जण एनपीपीत सामील झाले आहे. भाजपाचे त्रिपुरा येथील उपाध्यक्ष सुबल भौमिक, प्रकाश दास, देवशिष सेन यांनी भाजपाला रामराम केला आहे. यामुळे भाजपाला निवडणुकीआधी हादरा बसला आहे.