गुवाहाटी-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्यातील राजकीय पेच शिगेला पोहचला असतांना शिंदे गटातर्फे आमदार चिमणराव पाटील यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून स्पष्ट भूमिका मांडत भाजप हा आमचा नैसर्गिक मित्र असल्याचे प्रतिपादन केले आहे. ज्यांच्याशी सातत्याने लढलो त्या कॉंग्रेस-राष्ट्रवादीसोबत फक्त सत्तेसाठी अभद्र युती का ? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे.
एकनाथ शिंदे यांच्या गटातर्फे काल माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली होती. यानंतर रात्री उशीरा एकनाथ शिंदे यांच्या ट्विटर अकाऊंटवरून पारोळा-एरंडोल मतदारसंघाचे आमदार चिमणआबा पाटील यांनी यांचा एक व्हिडीओ जारी करण्यात आला आहे. यात्यांनी एकनाथ शिंदे गटासोबत जाण्याची भूमिका स्पष्ट करत अप्रत्यक्षपणे सेना नेतृत्वावर प्रश्न चिन्ह उपस्थित केले आहे.
या व्हिडीओत ते म्हणतात की एकनाथ शिंदे साहेबांनी मला माझे विचार मांडण्याची संधी उपलब्ध करून दिली याबाबत त्यांचे आभार ! ते पुढे म्हणाले की, आम्ही आधी कॉंग्रेस आणि नंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षासोबत संघर्ष करत आहोत. फक्त सत्ता मिळवणे हे आमचे ध्येय नाही. यामुळे विद्यमान सरकार स्थापन होण्याआधी आम्ही सर्व आमदारांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांस विनंती केली होती की, नैसर्गिक युती व्हावी. पण त्यांच्याकडून दाद न मिळाल्याने आम्ही आमचे नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे गेलो. आणि आमची अडचण त्यांनी सांगितली. तसेच त्यांच्याकडे याबाबत स्पष्ट भूमिका घेण्याचा आग्रह धरला.
आ. चिमणराव पाटील पुढे म्हणाले की, नैसर्गिक युती व्हावी ही अखंड महाराष्ट्र मधील सर्व शिवसैनिकांची इच्छा आहे. तर हिंदुत्वासाठी हिंदुत्वाच्या विचारधारेसाठी आम्ही एकत्र आलो आहोत. नाही की कोणता गट निर्माण करण्यासाठी, पक्ष तयार करण्यासाठी किंवा सत्तेत जाण्यासाठी. आम्ही अखंड महाराष्ट्र, हिंदुत्वाच्या विचारधारेसाठी बंड केले आहे. आणि आमच्या या बंडाच्या भूमिकेला दोन तृतीयांश पेक्षा अधिक पक्षाचे आमदार आणि १० सहयोगी अपक्ष आमदारांचे समर्थन असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे. याप्रसंगी त्यांनी कॉंग्रेस व विशेष करून राष्ट्रवादी कॉंग्रेस सोबत केलेल्या संघर्षाचा उल्लेख करत त्यांच्यासोबत जाण्याबाबत नाराजी व्यक्त केली.
आ. चिमणआबा पाटील पुढे म्हणाले की, एकनाथराव शिंदे यांच्यासोबत पक्षाचे दोन तृतीयांश सदस्य आहेत. देशाच्या राजकीय इतिहासातील हा एक मोठा प्रयोग असून यातून समविचारी सरकार स्थापन करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.