गोंदीया-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थकांची नाराजी ठिकठिकाणच्या शुभेच्छा फलकांमधून दिसून येत असतांना आता गोंदियातील फलक देखील राज्यात चर्चेचा विषय बनले आहेत.
राज्यात एकनाथ शिंदे यांनी स्वतंत्र गट स्थापन करून भाजपशी हातमिळवणी केल्यानंतर साहजीकच देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होतील अशी सर्वांचीच अपेक्षा होती. तथापि, आकस्मीकपणे एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद मिळाले, तर फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपद घ्यावे लागले. स्वत: फडणवीस यांनी श्रेष्ठींचा हा आदेश पाळला असला तरी त्यांचे समर्थक मात्र संतप्त झाले आहेत. नागपुरसह राज्यातील अनेक शहरांमध्ये त्यांच्या स्वागतासाठी लागलेल्या फलकांमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची प्रतिमा गायब असल्याचे दिसून आले आहे. यानंतर आता गोंदियातील फलक राज्यभरात चर्चेचे कारण बनले आहेत.
गोंदियातील विधानपरिषदेचे आमदार परिणय फुके हे देवेंद्र फडणवीस यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात. त्यांनी गोंदिया शहरात अनेक भव्य फलक लावले असून यात फलकावर फक्त देवेंद्र फडणवीस यांची मोठी प्रतिमा आणि त्याखाली ‘देवमाणूस’ असे लिहल्याचे दिसून आले आहे. यावर अमित शाह तर सोडाच पण मोदी, नड्डा आणि एवढेच नव्हे तर भाजपचे चिन्ह असणारे कमळ देखील गायब असल्याने राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू झाली आहे.