मुंबई (वृत्तसंस्था) सत्ता स्थापनेच्या दृष्टीकोणातून मुंबईत आज भाजपच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ उद्या राज्यपालांना भेटून राजकीय परिस्थितीवर चर्चा करणार असल्याची माहिती भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आज भाजपच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीत चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या एका शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भेटण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रसारमाध्यमांशी बोलताना सुधीर मुनगंटीवार यांनी त्याबाबतची माहिती दिली. काही गोष्टींचा थोडा संयम ठेवा. तुम्हाला गोड बातमी लवकरच मिळेल. जनतेने महायुतीला जनादेश दिला आहे. आम्ही भूमिकेशी ठाम आहोत. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात सरकार स्थापन होईल. मी आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उद्या (गुरूवारी) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहोत. आमचा फॉर्म्युला ठरला असून, योग्य वेळी सांगितला जाईल. जी नाराजी आहे. ती दूर केली. अंधेरा ढलेगा, उजाला आयेगा, असे सांगत मुनगंटीवार यांनी सत्ता स्थापनेचा दावा केला.