सांगली (वृत्तसंस्था) सांगलीतील भाजप नगरसेविका गीता सुतार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मराठा सेवा संघाचे खासगी पूरग्रस्त निवारा केंद्रात कोणतीही सुविधा मिळत नाही, म्हणून गुंडगिरीने गोंधळ घालत निवारा केंद्र बंद पाडलेय. धक्कादायक बाब म्हणजे सुतार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी या पूरग्रस्त निवारा केंद्रातील मदतीचे सामानही घेऊन गेल्याचा, आरोप मराठा सेवा संघांच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.
कोल्हापूर आणि सांगलीतील विविध संस्था, संघटनांकडून पूरग्रस्तांसाठी रोख मदतीसह अन्य काही जीवनावश्यक वस्तूंची मदत केली जात आहे. त्यासाठी पूरग्रस्तांसाठी अनेक छावण्या तयार करण्यात आल्या आहे. यात पूरग्रस्तांना जेवणासह इतर आवश्यक गोष्टींची सुविधा मिळते. सांगलीतही मराठा सेवा संघ या ठिकाणी एक खासगी पूरग्रस्त निवारा केंद्र उभारण्यात आले आहे. गेल्या 7 ते 8 दिवसांपासून या निवारा केंद्रामार्फत पूरग्रस्तांना मदत पुरवली जात आहे. त्या ठिकाणी जवळपास 500 ते 550 लोक राहत आहे.
या सर्व लोकांना जिल्हा कार्यालयातर्फे आलेली मदत पोहोचवली जात आहे. त्याशिवाय शासनाकडून येणारी मदत एकत्रित किटच्या माध्यमातून आज काहींना देण्यात येणार होती. मात्र अचानक भाजपच्या नगरसेविका गीता सुतार या ठिकाणी आल्या. त्यांनी या ठिकाणी कोणतीही सुविधा मिळत नाही असा आरोप केला. त्यांचा हा आरोप खोडून टाकण्यासाठी मराठा संघाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना पूरग्रस्तांना याबाबत विचारणा करायला सांगितले. त्यावेळी पूरग्रस्तांनी आम्ही अशाप्रकारे कोणतीही तक्रार केलेली नाही असे सांगितले. त्यावर सुतार भडकल्या आणि त्यांनी शिवीगाळ करायला सुरुवात केली. दरम्यान, गीता सुतार यांच्या कार्यकर्त्यांनी निवारा केंद्रातील कार्यकर्त्यांना केलेल्या मारहाणीत एक पूरग्रस्त महिला आणि एक कार्यकर्ता जखमी झाला आहे. तसेच एका महिला पत्रकारालाही यावेळी धक्काबुक्की करण्यात आली आहे.