मुंबई प्रतिनिधी । आगामी निवडणुकीसाठी उमेदवारांची नावे जवळपास निश्चित असून याबाबत आज दिल्लीत भाजपच्या कोअर समितीच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात येणार असल्याचे वृत्त आहे.
भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांनी एकमेकांविरूध्द कितीही विधाने केली असली तरी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी युती पक्की असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. मात्र सध्या पितृपक्ष असल्यामुळे याची घोषणा आता न करता घटस्थापनेच्या दिवशी केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, एकीकडे काही जागांवरून दोन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू असतांना दुसरीकडे आज दिल्लीत भाजपच्या कोअर समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह राज्याचे प्रभारी भूपेंद्र यादव आदींसह महत्वाचे नेते उपस्थित राहतील. तर राज्यातून मुख्यमंत्री फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आदीही यात सहभागी होतील. यात युतीबाबतची भूमिका आणि महत्वाचे म्हणजे उमेदवारांच्या यादीबाबत मंथन होणार आहे. युती होणार असल्याचे निश्चित असतांना ऐन वेळेस हा निर्णय न झाल्यास पक्षाने सर्वच्या सर्व म्हणजेच २८८ जागांवरून लढण्याची तयारी केली आहे. तर युतीतील जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यावरही यात चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.