यावलात खडसेंच्या अश्लील वक्तव्याचा भाजपकडून निषेध

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भाजप नेते व मंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात आमदार एकनाथ खडसे यांनी केलेल्या अश्लील आणि असभ्य वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध करत यावल तालुक्यात भाजपच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन उभारले. यावल तहसील कार्यालयासमोर निदर्शने करत खडसे यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवण्यात आला. या वेळी तहसीलदार मोहनमाला नाझिरकर यांना निवेदन सादर करण्यात आले.

भाजपच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले की, “गिरीश महाजन यांच्याविरोधात कोणतेही ठोस पुरावे नसताना आमदार खडसे यांनी जाणीवपूर्वक अश्लील भाषेचा वापर करून मंत्री महाजन यांच्या प्रतिमेला धक्का पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. हा प्रकार अत्यंत निंदनीय असून खडसे यांनी त्वरित जाहीर माफी मागावी. अन्यथा भाजपाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल.” निवेदनात असेही म्हटले आहे की, “खडसे यांच्या या वक्तव्यामुळे त्यांचा खरा चेहरा समोर आला असून, त्यांच्या भाषेने राजकीय सभ्यतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत.”

या आंदोलनात भाजपाचे यावल तालुकाध्यक्ष उमेश फेगडे, तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन पांडुरंग सराफ, माजी चेअरमन नरेंद्र नारखेडे, यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राकेश फेगडे, व्हाईस चेअरमन अतुल भालेराव, संचालक तेजस पाटील, तालुका सरचिटणीस विलास चौधरी व उज्जैनसिंग राजपूत, माजी तालुका अध्यक्ष डॉ. नरेंद्र कोल्हे, ओबीसी विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष हेमराज उर्फ बाळू फेगडे आदींसह भाजपाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यकर्त्यांनी निषेध करताना जोरदार घोषणाबाजी केली असून, खडसे यांच्या वक्तव्याविरोधात जनमत तयार करण्याचा इशाराही यावेळी दिला गेला.

Protected Content