मुंबई । रिपब्लीक चॅनलचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेचे तीव्र पडसाद उमटले असून भाजपने हा पत्रकारितेच्या स्वातंत्र्यावर हल्ला असल्याचे सांगत राज्य सरकारचा निषेध केला आहे.
रिपब्लीक चॅनलचे संपादक अर्णब गोस्वामी यांना आज पहाटे अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर अन्वय नाईक यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. तथापि, त्यांच्यावर आजवर कारवाई करण्यात आलेली नव्हती.
आज पहाटे अर्णब गोस्वामी यांना पनवेल पोलिसांनी अटक केली आहे. गोस्वामी यांना अटक केल्यामुळे खळबळ उडाली असून भाजपने याचा निषेध केला आहे. भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये व आमदार अतुल भातखळकर यांनी याचा निषेध केला आहे. तर केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी या प्रकरणाचा निषेध करणारे ट्विट केले आहे. यात म्हटले आहे की, हा वृत्तपत्राच्या स्वातंत्र्यावर घाला घालण्याचा प्रयत्न आहे. महाराष्ट्र सरकार अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्याचा गळा घोटत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
अन्वय नाईक या इंटिरीअर डेकोरेटरने आत्महत्या केली होती. अर्णब यांनी आपले पैसे थकविल्यामुळे आपण आत्महत्या करत असल्याची सुसाईड नोट नाईक यांनी लिहून ठेवली होती. याच गुन्ह्यात त्यांना आज पहाटे अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.