मुंबई वृत्तसंस्था । देशाचा नागरिक हा राजा आहे, त्याच्या हक्कावर गदा येणार असेल तर या देशात हा कायदा लागू होऊ देणार नाही, भाजपमध्ये हिंमत असेल, तर मला अटक करा, नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला आमचा विरोध आहे, असे वक्तव्य भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले.
या देशात मोदी आणि शहा हे हुकूमशाही लादत आहेत, या देशातील सुजाण नागरिकांना स्थानबद्धता केंद्रांमध्ये जायचे नसेल तर त्यांनी या कायद्याला विरोध करायलाच हवा, असेही आंबेडकर म्हणाले. नागरिकत्व कायद्याला विरोध करण्यासाठी गुरुवारी प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत मोर्चा काढण्यात आला, यावेळी प्रकाश आंबेडकर बोलत होते.
नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचे सरकार पडले पाहिजे. दोन लाख जण मावतील इतके मोठे स्थानबद्धता केंद्र बांधले जात आहे, तिथे जायचे नसेल, तर मोदी सरकार पाडा, असे आवाहन आंबेडकर यांनी केले. अनेक जणांकडे रहिवासी पुरावे नाहीत, स्थानबद्धता केंद्रे उभारल्यास तोडून टाकू, कायद्याला संघर्षाने उत्तर द्यावे लागत आहे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपचा हा कट आहे. भाजप अराजकता माजवत आहे, असा आरोप त्यांनी केला. नागरिकत्व दुरुस्ती कायदा ४० टक्के हिंदूंच्यांही विरोधात आहे, असे त्यांनी सांगितले.