Home Cities यावल जातीनिहाय जनगणनेच्या निर्णयाचे यावलमध्ये स्वागत !

जातीनिहाय जनगणनेच्या निर्णयाचे यावलमध्ये स्वागत !


यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । केंद्र सरकारने घेतलेल्या सर्वसमावेशक जातीनिहाय जनगणनेच्या ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत यावल तालुक्यात भाजपच्या वतीने जल्लोषात करण्यात आले. या निर्णयामुळे समाजातील प्रत्येक घटकाचा विकास अधिक प्रभावीपणे करता येईल, असा विश्वास यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर यावल-रावेर विधानसभा मतदारसंघाचे आ.अमोल जावळे यांच्या नेतृत्वाखाली शहरातील भुसावळ टी पॉईंटवर भाजप पदाधिकाऱ्यांनी फटाके फोडून व मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष शरद महाजन, डॉ. कुंदन फेगडे यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमात यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राकेश फेगडे, उमेश फेगडे, जिल्हा परिषदचे माजी शिक्षण व आरोग्य सभापती रविंद्र उर्फ छोटू पाटील, यावल मंडळ अध्यक्ष सागर कोळी, उमेश बेंडाळे, खरेदी विक्री संघाचे संचालक नरेंद्र नारखेडे, भाजपाचे माजी शहराध्यक्ष निलेश गडे, गोपाळसिंग पाटील, हेमराज उर्फ बाळू फेगडे, तसेच सध्याचे शहराध्यक्ष राहुल बारी आणि नितीन चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती.

देशातील सर्व जाती धर्माच्या नागरिकांची समावेशक नोंद करणाऱ्या या जनगणनेमुळे शासनाच्या योजनांचा योग्य लाभ गरजूंपर्यंत पोहोचविण्यास मदत होईल, असे मत पदाधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केले. देशाच्या सामाजिक व आर्थिक विकासाच्या दृष्टीने हा निर्णय मैलाचा दगड ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.


Protected Content

Play sound