मुंबई (वृत्तसंस्था) नवी मुंबईतील बेलापूर मतदारसंघातून भाजपची उमेदवारी न मिळालेले दिग्गज नेते गणेश नाईक यांच्यासाठी अखेर त्यांचे पुत्र तथा भाजपाचे ऐरोली मतदारसंघाचे उमेदवार संदीप नाईक यांनी माघार घेण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे गणेश नाईक विधानसभा निवडणूक लढणार हे स्पष्ट झाले आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडून १२५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आल्यानंतर यामध्ये राष्ट्रवादीतून भाजपात आलेल्या गणेश नाईक यांचे नाव नक्की असेल असे समजले जात होते. गणेश नाईक यांच्या भाजपा प्रवेशामुळे विद्यमान आमदार मंदा म्हात्रे यांचा पत्ता कट केला जाण्याची शक्यता व्यक्त होती. पण भाजपाने मंदा म्हात्रे यांना तिकीट दिल्याने गणेश नाईक यांची संधी हुकली असल्याची चर्चा होती. नाराज गणेश नाईक यांनी सकाळी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेटही घेतली होती. परंतू त्याचाही काहीही उपयोग झाला नाही.
भाजपने केवळ संदीप नाईक यांनाच ऐरोली मतदारसंघातून उमेदवारी दिली. गणेश नाईक यांना उमेदवारी देण्याचे टाळले. बेलापूर मतदारसंघातून नाईक यांच्या कट्टर विरोधक व विद्यमान आमदार मंदा म्हात्रे यांनाच पुन्हा संधी देण्यात आली. त्यामुळे नाईक समर्थकांना जोरदार धक्का बसला आहे. गणेश नाईक पुरते कोंडीत सापडले. ही कोंडी फोडण्यासाठी अखेर त्यांच्या मुलाने पुढाकार घेत माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे.