मुंबई प्रतिनिधी | राज्य विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू होण्याआधी विरोधी भारतीय जनता पक्षाने विधीमंडळाच्या पायर्यांवर ठिय्या आंदोलन करून निषेध व्यक्त केला आहे.
आजपासून राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. कोरोनाच्या आपत्तीमुळे हे अधिवेशन सात दिवसांचे घेण्यात येत असून आज पहिल्याच दिवशी भारतीय जनता पक्ष सत्ताधार्यांना विविध मुद्यांवरून धारेवर धरणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. याची चुणूक कालच्या पत्रकार परिषदांमधून दिसून आलेली आहे. कालच देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता.
दरम्यान, आज विधीमंडळाचे अधिवेशन सुरू होण्याआधी विरोधी भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी विधीमंडळाच्या पायर्यांवर जोरदार निषेध आंदोलन केले. याप्रसंगी देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांच्यासह पक्षाचे ज्येष्ठ आमदारांसह अन्य आमदार उपस्थित होते. या ठिकाणी आमदारांनी ठिय्या मांडत महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.