आज एरंडोलचे माजी आमदार तथा राजकीय, सहकार, सामाजिक क्षेत्रातील मातब्बर व्यक्तीमत्व म्हणून गणले जाणारे बापूसाहेब महेंद्रसिंग पाटील यांचा वाढदिवस. यानिमित्त त्यांचे स्नेही अभियंता मुखत्यारसिंग माधव ( एम.एम. ) पाटील यांनी त्यांच्या आजवरच्या तेजस्वी कारकिर्दीचा लाईव्ह ट्रेंडस न्यूजसाठी घेतलेला आढावा आपल्याला सादर करत आहोत.
जेमतेम पंचविशी पार केलेला तरुण आणीबाणी नंतरच्या इंदिराविरोधी भारावलेल्या राजकीय सामाजिक स्थित्यंतराच्या काळात राजकीय क्षेत्रात प्रवेश करण्याचे धाडस करतो. पाठीशी पुरेसे आर्थिक, सामाजिक बळ नसतांना आपल्या इच्छाशक्ती, परिश्रम, संघटन आणि वक्तृत्व गुणांच्या आधारावर विधानसभा निवडणुकीत सर्वात तरुण सदस्यांपैकी एक म्हणून पहिल्याच प्रयत्नात निवडून येतो… ही अचंभीत करणारी यशोगाथा आहे बापूसाहेब महेंद्रसिंग पाटील यांची.
जळगाव जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते स्व. सोनूसिंग अण्णा यांच्या पारखी नजरेने बापूंना हेरले आणि १९७८ च्या विधानसभा निवडणुकीत अण्णांच्या प्रयत्नांनी बापूंना एरंडोल विधानसभा मतदारसंघातून जनता पक्षाचे तिकीट मिळाले. नवीन पक्ष, नवखा उमेदवार आणि समोर पारुताई वाघ, मु.गं. पवार यांच्यासारखे ज्येष्ठ प्रतिस्पर्धी… अश्या परिस्थितीत सर्वसामान्य नागरिकांची साथ, कॉंग्रेस विरोधी जनमत याच्या आधारे अटीतटीच्या लढतीत बापूसाहेब साडेसहा हजारापेक्षा जास्त फरकाने विजयी झाले. ते विधानसभेतील सर्वात तरूण उमेदवार होते हे विशेष.
त्यानंतरची जवळपास तीन दशकं एरंडोल मतदारसंघात पंचायत समिती, जिल्हा परिषद, सहकार क्षेत्रात बापूंचा दबदबा कायम राहिला. बापूसाहेब हे १९९० मध्ये जनता दलाच्या तिकिटावर दुसर्यांदा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले. यात १९७८ ला मिळाली होती तितकीच मते मिळाली परंतु ते तिसर्या क्रमांकावर राहिले. मात्र लढवय्या स्वभाव स्वस्थ बसू देईना. पंचायत समिती सभापती पदाच्या माध्यमातून पुन्हा नव्याने बांधणी सुरू केली. १९९२ ला राज्यात स्वबळावर पंचायत समिती जिंकणार्या पाच पंचायत समित्यांपैकी बापूसाहेबांच्या नेतृत्वाखालील एरंडोल एक होती. १९६२ ते साधारणपणे १९९६ पर्यंत पंचायत समिती सभापती हे तालुक्यातील एक सत्ताकेंद्र असे. स्वतंत्र कार्यालय, बंगला, गाडी, स्टाफ… शिवाय ग्रामीण भागातील योजनांचा लाभ खेड्यापाड्यात पोचवण्यासाठी असलेली शासकीय यंत्रणा; यामुळे जनसंपर्काच्या दृष्टीने पंचायत समिती सभापती या पदाचा मोठा उपयोग होत असे. शिवाय त्यावेळेस पाच वर्षे पदावर राहण्याचे राजकीय स्थैर्य होते. बापूंनी सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन बेरजेचे राजकारण करत जनता दलाचे उमेदवार म्हणून १९९५ ला १९९० च्या तुलनेत दुप्पट मते मिळवून विजयश्री खेचून आणली. १९९५ ला १८९८६ मतांच्या फरकाने निवडून येण्याचा रेकॉर्ड एरंडोल विधानसभा मतदारसंघात आजही कायम आहे.
दरम्यान, १९९५ च्या निवडणुकीला एक सामाजिक सुधारणेची पार्श्वभूमी होती; त्याविषयी आज सांगितलेच पाहिजे ! राजपूत हा रूढी-परंपरा प्रिय समाज. विधवा भगिनीस विवाहाची संधी नाकारणार्या अनिष्ट प्रथेत अडकून पडलेल्या समाजात विधवा विवाहाविषयी विचारमंथन सुरू झाले होते पण पाठिंब्यापेक्षा विरोधाचाच आवाज बुलंद होता. विशेष म्हणजे या विरोधात महिला वर्गाचा देखील समावेश होता. सामाजिक बदल, सुधारणा या वरून खाली झिरपतात. बदलत्या काळाची पावले ओळखून समाजाला विधायक दिशा देण्याचे कार्य, प्रसंगी समाजाचा विरोध पत्करून जो नेटाने चालूच ठेवतो तोच खरा द्रष्टा नेता. त्यातही राजकीय क्षेत्रातील नेत्याने सामाजिक रूढी परंपरा विरोधात भूमिका घेणे म्हणजे राजकीय हरकिरीच होय. तरीही सामाजिक दबाव, विरोध झुगारून राजपूत समाजातील पहिला विधवा विवाह बापूसाहेबांच्या पुढाकाराने छोटेखानी का होईना पण पार पडला तो पद्मालय या तीर्थक्षेत्री !
त्यानंतर महेंद्रबापूंच्या समर्थनाने मोठा धाडसी निर्णय घेतला तो जगदीश पाटील या युवकाच्या सहकार्याने. एरंडोल येथे मोठ्या समारंभात जगदीश आणि राखी हे सत्यशोधक पध्दतीत विवाहबद्ध झालेत. मंचावर महाराणा प्रताप, शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना वंदन करून वैदिक पद्धतीला फाटा देऊन हा विवाह पार पडला. या विवाहाने राजपूत समाजाने विधवा विवाहाच्या सामाजिक क्रांतीच्या दिशेने पहिले आश्वासक आणि दमदार पाऊल टाकले. या विवाहाला दादासाहेब रावळ यांच्या विधवा कन्येसह अनेक सुधारणावादी मान्यवर यांनी उपस्थित राहून आशिर्वाद दिले होते. समाजात आज विधवा विवाह व्हायला लागलेत त्यासाठी तीस वर्षांपूर्वी बापूसाहेबांचे, जगदीश आणि राखी पाटील यांचे धाडस आणि योगदान लक्षात ठेवायला हवे.
बदलत्या काळानुसार जनता पक्ष प्रभावहीन होत गेला. साथी गुलाबराव पाटील, ओंकारअप्पा वाघ, गजाननराव गरुड अश्या दिग्गज नेत्यांनी काही काळ किल्ला लढवला पण कालौघात पक्षाचे अस्तित्वच कमकुवत झाल्याने जनता पक्षाच्या या धुरीणांच्या राजकारणास ओहोटी लागली. आपल्या दुसर्या विधानसभा सदस्यत्व काळात विरोधी बाकावरील बापूसाहेबांनी अभ्यासपूर्ण आणि आक्रमकपणे अनेक मुद्दे मांडून सभागृहात आपली छाप पाडली. निवडणूक प्रचारात आपल्या मातृभाषेत, अहिराणीत तडाखेबंद भाषण करून सभा जिंकणार्या वक्त्यात साथी गुलाबराव पाटील यांच्यानंतर बापूसाहेबांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाई.
विरोधात असतांना सत्ताधार्यांकडून मतदारसंघात निधी खेचून आणणे हे फार कमी राजकीय नेत्यांना शक्य झाले आहे; त्यापैकीच एक म्हणजे बापूसाहेब होत. अंजनी धरण हे त्याचे एक उदाहरण आहे. राजकारणा व्यतिरिक्त बापूसाहेबांचा राजपूत आणि मराठ्यांच्या इतिहासाचा, सहकार क्षेत्र, कृषी क्षेत्राचा गाढा अभ्यास आहे. अनेक जुने संदर्भ त्यांच्याकडे आहेत. आजही वाचन सुरूच आहे.
कौटुंबिक स्तरावर अत्यंत समाधानी आणि हेवा वाटावा असे वातावरण आहे. आपलीच नव्हे तर भावाची, बहिणीची मुलं, सुना, जावई, नातवंड यांना आपापल्या क्षेत्रात यशस्वी होतांना बघायला मिळणे यापेक्षा अधिक श्रीमंत आणि भाग्यवंत कोण असू शकतो ? अनेक चढ उतार पाहिलेल्या, तत्वांशी तडजोड न करता संघर्षातून आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणार्या बापूसाहेबांना आई भवानी उत्तम आरोग्यासह उदंड आयुष्य देवो, त्यांचा सहवास, मार्गदर्शन नवीन पिढीला लाभत राहो हीच वाढदिवसानिमित्त प्रार्थना.
अभियंता मुखत्यारसिंग माधव पाटील ( उर्फ एम.एम. पाटील )
( मोबाईल क्रमांक : ८९७५७६९५३०)