Home क्राईम ट्रक व दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

ट्रक व दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार


यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील अंजाळे गावाजवळील मोर नदीच्या पुलावर शनिवारी एक दुर्दैवी घटना घडली. ट्रक आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात टाकरखेडा येथील ५५ वर्षीय दुचाकीस्वार संतोष धनगर यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात इतका जबरदस्त होता की, दुचाकी पूर्णतः चिरडली गेली असून, मृत्यूही जागीच झाला. अंजाळे गावकऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पोलिसांना माहिती दिली.

प्राप्त माहितीनुसार, संतोष उखर्डू धनगर (वय ५५, रा. टाकरखेडा, ता. यावल) हे भुसावळकडून यावलच्या दिशेने दुचाकी (क्र. एम. एच. १९ डी.क्यु.७३६९) वरून जात असताना मोर नदीच्या पुलावर समोरून भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने (क्र. एम. एच. ३४ बी.जी. ५०१५) त्यांना जोरदार धडक दिली. ही धडक इतकी तीव्र होती की, पुलाच्या वळणावरच संतोष धनगर यांचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच अंजाळे ग्रामपंचायतचे सदस्य आनंद सपकाळे आणि गावातील काही नागरिक तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. यावल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी यावल ग्रामीण रुग्णालयात हलविला. या प्रकरणी संतोष धनगर यांचे नातेवाईक दीपक धनगर यांच्या तक्रारीवरून ट्रकचालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या अपघाताच्या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिक आणि वाहनधारकांमध्ये तीव्र संतापाची भावना आहे. नागरिकांनी यावल-भुसावळ रस्त्याच्या दयनिय स्थितीबद्दल नाराजी व्यक्त केली असून, अंजाळेपासून वाघळूद आणि राजोरा फाटा ते यावल दरम्यान अनेक ठिकाणी वळणांवर झाडाझुडपांची अतिक्रमणे, काटेरी झुडपे आणि अपुरे रस्ते संरक्षक उपाय यामुळे वारंवार अपघात घडत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. मागील काही महिन्यांतील ही अपघाताची तिसरी घटना असल्याने प्रशासनाकडून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे.

या दुर्दैवी घटनेमुळे टाकरखेडा गावावर शोककळा पसरली आहे. संतोष धनगर हे अत्यंत मनमिळावू आणि समाजप्रिय व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या अचानक जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.


Protected Content

Play sound