
चोपडा लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील धनवाडी ते गरताड रस्त्यावर विना क्रमांकाच्या भरधाव ट्रॅक्टरने दिलेल्या भीषण धडकेत एका ५४ वर्षीय दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेत मृताचे नाव नंदकिशोर देवसिंग चौधरी (वय ५४, रा. धनवाडी, ता. चोपडा) असे असून, त्यांच्यासोबत असलेल्या फिर्यादीलाही दुखापत झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बन्सीलाल काळू पाटील यांच्या शेताजवळ घडली. मृत नंदकिशोर चौधरी हे त्यांच्या बजाज प्लॅटिना मोटारसायकलने (क्र. MH 19 DL 0990) फिर्यादी सुभाष रुपसिंग चौधरी यांना मागे बसवून शेतातून घराकडे जात होते.
त्याच वेळी समोरून येणाऱ्या निळ्या रंगाच्या सोनालिका कंपनीच्या विना क्रमांकाच्या ट्रॅक्टरने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत अत्यंत वेगात आणि हयगयीने चालवून दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, नंदकिशोर चौधरी यांचा गंभीर दुखापत झाल्यामुळे मृत्यू झाला. या अपघातात दुचाकीचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
याप्रकरणी सुभाष रुपसिंग चौधरी यांनी चोपडा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी करत आहेत.



