जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागातून दुचाकींची चोरी करणाऱ्या एकाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. संशयित आरोपीकडून जळगाव शहरातील विविध भागातून चोरी केलेल्या १५ दुचाकी हस्तगत करण्यात आले आहे. पारदर्शी उल्हास पाटील (वय-२०) रा.पिंपळगाव बु ता. जामनेर जि. जळगाव असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

सविस्तर असे की, जळगाव जिल्ह्यात वेगवेगळ्या भागातून दुचाकी चोरीचे प्रमाण अधिक प्रमाणावर वाढत असल्याने जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी दुचाकी चोरी करणाऱ्यांना अटक करण्याच्या सुचना दिल्या होत्या. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी सहाय्यक फौजदार अशोक महाजन, शरीफ काझी, युनुस शेख, किशोर राठोड, विनोद पाटील, रणजित जाधव, उमेशगिरी गोसावी, वसंत लिंगायत, महेश महाजन, अशोक पाटील आणि मुरलीधर बारी असे पथक जामनेर तालुक्यातील पिंपळगाव येथे रवाना केले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचुन संशयित आरोपी पारदर्शी उल्हास पाटील (वय-२०) याला अटक केले. त्याची अधिक चौकशी केली असता त्याने गेल्या दोन महिन्या जळगाव शहरातील वेगवेगळ्या भागातील एकुण १५ चोरीच्या दुचाक्या काढून दिल्या आहे. पुढील कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी करीत आहे.