अज्ञात कारच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील गाडगेबाबा चौकात अज्ञात कारने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना ३० जून रोजी सायंकाळी ६.३० वाजता घडली होती. याप्रकरणी चौकशी अंती मंगळवारी ९ जुलै रोजी रात्री ९ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, राजेश नरेंद्र नारखेडे वय-५५, रा. विनोबानगर, मोहाडी फाटा जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. ३० जून रोजी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास ते दुचाकीने जळगाव शहरातून मोहाडीरोडने घरी जात असताना, संत गाडगेबाबा चौकात त्यांना अज्ञात वाहनाने मागून दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत ते गंभीर जखमी झाले. अपघात घडल्यानंतर चालक हा कार घेवून पसार झाला होता. त्यांना शहरातील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांनी उपचार घेतल्यानंतर मंगळवारी ९ जुलै रोजी रात्री ९ वाजता त्यांनी रामानंदनगर पोलिसात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात कारचालकावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोहेकॉ अजित पाटील करीत आहे.

Protected Content